नाशिक : प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या शालिमारसह आजूबाजूच्या परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मोहीम राबवण्यात आली. रस्त्याची वाट अडवून दुकाने थाटणार्यांवर प्रशासनाने कारवाई करत साहित्य जप्त केले.
अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे व उपायुक्त अश्विनी गायकवाड यांच्या आदेशान्वये विभागीय अधिकारी चंदन घुगे व राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त मोहीम पश्चिम व पूर्व विभागात राबविण्यात आली. रविवार कारंजा ते मेनरोड ते दहीपूल, शालिमार ते भद्रकाली, दूधबाजारापर्यंत गाडीधारकांवर व दुकानधारकांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
यावेळी दोन ट्रक साहित्य आडगाव गुदामात जमा करण्यात आले. यावेळी अतिक्रमणधारकांकडून हातगाडा, लोखंडी जाळ्या, टेबल, प्लास्टिक खुर्च्या, कपडे, फर्ची पुसणे स्टूल, लोखंडी टेबल, प्लास्टिक पाल, झाडू, खराटे, प्लास्टिक टेबल इत्यादी साहित्य जप्त केले गेले.
शहरात यापुढे अशीच कारवाई केली जाईल. त्यामुळे कोणीही रस्त्यावर अवैधपणे दुकाने थाटू नये.अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला. सदर मोहिमेत पश्चिम निरीक्षक विनायक जाधव, पश्चिम विभागप्रमुख प्रवीण बागूल, जीवन ठाकरे, अनिल लोकरे, सुनील कदम, मोहन भांगरे, जावेद शेख, संतोष पवार उपस्थित होते.