फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज अधिकारी असल्याचे भासवून ट्रक लुटणार्‍या टोळीतील 3 आरोपी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट- 1 नाशिकची धडक कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी
फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून सुपारी भरलेले दोन ट्रक अडवून लूटमार करणार्‍या टोळीतील तिघांना नाशिक गुन्हे शाखा युनिट क्र. 1 ने अटक केली आहे. आरोपींकडून चार लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही घटना 11 मे 2025 रोजी पहाटे 5 वाजता येवला टोलनाक्यावर घडली. ट्रक अडवून चालकांचे मोबाइल, पैसे, ट्रकच्या चाव्या, कागदपत्रे जबरदस्तीने हिसकावून घेतली होती. या प्रकरणी फिर्यादी मणिशंकर मिश्रा यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहा. आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 ने तपास सुरू केला. गुप्त बातमीच्या आधारे गरवारे पॉइंट येथे सापळा रचून आरोपी चारुदत्त त्र्यंबक भिंगारकर (37) आणि मयूर अशोक दिवटे (32) यांना स्विफ्ट कारसह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून कार, मोबाईल, ट्रकची कागदपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स आणि सुपारी मालाच्या पावत्या असा 4 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर तिसरा आरोपी अशोक सोनवणे (35, रा. इंदिरानगर) याला टिळकवाडी सिग्नल भागातून अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोनि मधुकर कड, सपोनि हिरामण भोये, तसेच युनिट 1 चे अधिकारी व अंमलदारांच्या चमूने केली. तांत्रिक विश्लेषणासाठी मसपोनि जया तारडे यांचे विशेष योगदान लाभले. गुन्हे शाखेच्या तडाखेबंद कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *