वीटभट्ट्यांवर कारवाई करताना ढिसाळपणा

प्रेरणा बलकवडे संतप्त; अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

नाशिक : प्रतिनिधी
दारणा नदी परिसरातील प्रदूषण आणि अनधिकृत वीटभट्ट्यांविरोधात नागरिकांच्या तक्रारींनंतर अखेर काल कारवाईला सुरुवात झाली. मात्र, या कारवाईदरम्यान नगरपालिकेचे मुख्याधिकारी फोन बंद ठेवून गायब राहिले. दोन महिन्यांपासून पोलिस बंदोबस्ताची मागणी करूनही पोलिस विभागाने टाळाटाळ केली होती.
बंदोबस्तासाठी वीस हजार रुपये शुल्क भरल्यानंतर बंदोबस्त पुरविण्यात आला. मात्र, तेदेखील उशिरा आले. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात येत आहे. तथापि, अधिकार्‍यांनी मात्र टाळाटाळ केल्याने या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे यांनी केली आहे.
नगरपालिकेकडे एकच जेसीबी आणि डंपर उपलब्ध नसल्यामुळे अतिक्रमण पूर्णपणे काढता आले नाही. विशेष म्हणजे, दुपारी 3 वाजता जेवणाचे कारण देत कर्मचारी निघून गेले आणि परत आलेच नाहीत. या संपूर्ण ढिसाळ कारभारामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी संताप व्यक्त करत, संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली आहे. नोटीस देऊन, खर्च करूनही कारवाई होत नसेल तर हा जनतेच्या पैशांचा अपमान आहे, असे त्या म्हणाल्या.
या पार्श्वभूमीवर, वीटभट्टीधारकांकडून आर्थिक तडजोड व हफ्तेबाजी केल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे. दारणा नदी परिसर प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळावा आणि परिसर सुशोभित होईपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही प्रेरणा बलकवडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *