इंस्टाग्रामवरून ब्लॅकमेल; अल्पवयीन मुलीकडून लाखोंची वसुली
– नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
सिडको विशेष प्रतिनिधी – सोशल मीडियाच्या अतिवापराचे गंभीर परिणाम समोर आले असून, नाशिकमध्ये अल्पवयीन मुलाने आपल्या वर्गातील अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल सहा ते सात लाख रुपयांची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व संबंधित विद्यार्थी एकाच शाळेतील असून, आरोपी व पीडित मुलगी हे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ साली पीडित मुलीची ओळख शाळेतील दोन मुलांशी झाली. सोशल मीडियावर संपर्क वाढत गेला आणि त्यातील एकाने तिला भावनिक फसवून विवस्त्र व्हिडीओ कॉलसाठी भाग पाडले. त्यानंतर त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी पैसे उकळण्यास सुरुवात केली. पीडित मुलीने घाबरून घरातील लॉकरमधून पैसे काढून दिले. काही दिवसांनी दुसऱ्या मित्राने देखील फोटो असल्याचे सांगून ६०-७० हजारांची मागणी केली. त्यानंतर आणखी एक मुलगी पुढे येत, तिने देखील धमकी देऊन ७ हजार रुपये उकळले.
शेवटी पीडितेच्या आईला तिचा मोबाईल सापडल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला. तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला. नंतर तिघांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.