पिंपळगावच्या व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल
चांदवड : वार्ताहर
तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याची तब्बल 15 लाख 18 हजारांंची फसवणूक झाली. याप्रकरणी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात
पिंपळगाव येथील व्यापारी अफजल गुलाब मोगल याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
वडनेर भैरव येथील द्राक्ष उत्पादक प्रमोद दत्तात्रय निखाडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार पिंपळगाव येथील व्यापारी अफजल गुलाब मोगल याने तीन ते सहा एप्रिलदरम्यान निखाडे यांच्या वडनेरभैरव शिवारातील द्राक्षबागेतून 244 क्विंटल 86 किलो द्राक्षे खरेदी केली होती. या द्राक्षांची किंमत 15 लाख 18 हजार 132 रुपये होती आणि सौदा 62 रुपये प्रतिकिलो दराने ठरला होता. या खरेदीच्या बदल्यात मोगल यांनी निखाडे यांना 15 लाख 18 हजारांचे धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश बँकेत जमा केल्यानंतर ते न वटल्याने शेतकर्याची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर प्रमोद निखाडे यांनी तत्काळ वडनेरभैरव पोलीस ठाण्यात धाव घेऊन व्यापारी अफजल मोगल याच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.