पालिकेकडून खड्डे दुरुस्ती
नाशिक : प्रतिनिधी
हजारो प्रवासी ज्या नाशिकरोड बसस्थानक परिसरातून शहरात येतात. व शहरातूनही नाशिकरोड बसस्थानकात तेवढ्याच संख्येने प्रवासी येतात. परंतु, अवकाळी पावसामुळे बसस्थानक परिसरात मोठमोठे खड्डे पडल्याचे चित्र होते. मात्र, याकडे महापालिका प्रशासनासह एसटी महामंडळाने दुर्लक्ष करून चालतंय चालू द्या, असे धोरण स्वीकारले होते. याप्रकरणी दै. गांवकरीने वृत्त प्रसिद्ध करताच झोपलेल्या पालिका प्रशासनाला जाग येताच बुधवारी (दि.21) बसस्थानकातील खड्डे दुरुस्तीची कामे करण्यात आली.
बसस्थानकात मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. बसस्थानकातील खड्ड्यांवरून नागरिकांकडून तीव्र संंताप करतानाच याकडे लक्ष दिले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रवासी संघाचे उपाध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिला होता. त्यानंतर सुस्तावलेल्या पालिकेकडून बुधवारी सकाळी खड्डे दुरुस्ती केली गेली. खड्ड्यांमुळे बसस्थानकाची दुरवस्था झाली होती. शहरात दररोजच्या दमदार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते उखडले आहेत. नाशिकरोड बसस्थानकातही असेच चित्र होते. खड्डे दुरुस्ती होत नसल्याने अपघाताची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. नाशिकरोड बसस्थानकात दररोज हजारो प्रवासी सिटीलिंक पकडण्यासाठी येतात. रेल्वेस्थानक, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक-पुणे महामार्ग याच परिसरात असल्याने चोवीस तास वाहनधारकांची वर्दळ नाशिकरोड बसस्थानकात असते. त्यामुळे खड्डे दुरुस्ती तत्काळ करण्याची मागणी नागरिक करत होते. अखेर महापालिकेने बुधवारी बसस्थानकातील मोठमोठी खड्डे बुजविल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.