नाशिक : प्रतिनिधी
मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर नाशिक महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने आरोग्य उपसंचालकांकडे दहा हजार अँटिजन टेस्ट किटची मागणी केली आहे. तसेच आवश्यक वाटल्यास खासगी कंपनीकडून किट खरेदी केली जाणार आहेत. बिटको व डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात वीस खाटांची सोय पालिका प्रशासनाने केली आहे.
कोरोनाच्या लक्षणात बदल होत असल्याने खबरदारीच्या सूचना पालिकेने केल्या आहेत. लोकांची गर्दी, योग्य स्वच्छतेचा अभाव, आणि मास्कचा वापर न करणे या सवयींमुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. सर्दी, खोकला, ताप, दम लागणे किंवा गंध व चव जाणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरात विलगीकरण करा आणि इतरांच्या संपर्कात जाणे टाळा. ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर दीर्घकालीन आजार आहेत त्यांनी नियमित आरोग्य तपासणी करा.
कोरोनामुळे आलेल्या तणावाचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ध्यान, योग आणि सकारात्मक विचार यांचा सराव करा. आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवा आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. मुंबई येथे आलेल्या कोरोनाच्या साथीनंतर आता महापालिकाही अलर्ट झाली असून, नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तीन वर्षांपूर्वी कोरोनाने शहरात हाहाकार माजवला होता. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण मुंबईत सापडल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
आरोग्य उपसंचालकांकडे दहा हजार अँटिजन टेस्ट किटची मागणी करण्यात आली आहे.
खबरदारी म्हणून ही मागणी करण्यात आली आहे.
शहरात अद्याप कोणीही संशयित रुग्ण नाही.
मात्र, नागरिकांनी काळजी घ्यावयाची आहे.
-डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा