भक्ती गुजराथी आत्महत्याप्रकरणी पती, सासर्‍यास अटक

गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

सिडको : विशेष प्रतिनिधी
विवाहित महिलेच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नाशिक शहर पोलीस दलाच्या गुंडाविरोधी पथकाने तांत्रिक व मानवी गुप्त माहितीद्वारे आहे.

फिर्यादी दिलीप प्रभाकर माडीवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी भक्ती अथर्व गुजराथी (वय 33) हिला तिचे पती अथर्व गुजराथी, सासरे योगेश गुजराथी व सासू मधुरा गुजराथी यांनी सातत्याने माहेरून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात 20 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले होते. पुण्यातील विवाहित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला आरोपींचा तत्काळ शोध घेण्याचे आदेश दिले होते. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कौशल्याने तपास सुरू केला.
तपासादरम्यान आरोपी गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यात लपल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, प्रविण चव्हाण यांनी गुजरातमध्ये
धाड टाकली. 24 मे रोजी नवसारी जिल्ह्यातील वांसदा तालुक्यात वनविकास मंडळाच्या परिसरातून अथर्व योगेश गुजराथी (वय 35) याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून एमएच 15- जेएम 7421 या क्रमांकाची टोयोटा चारचाकी व सॅमसंग मोबाईल असा सुमारे 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दुसरा आरोपी योगेश मणिलाल गुजराथी (वय 65) याला वांसदा येथील हॉटेल महाराजा अ‍ॅण्ड गेस्ट हाउस येथून अटक करण्यात आली. या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, भुषण सोनवणे, राजेश राठोड, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, कल्पेश जाधव, अशोक आधाव, सुनीता कवडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *