शहरातून धोकादायक प्लास्टिक हद्दपार कधी होणार?

वर्षभरात साडेचार हजार किलो प्लास्टिक जप्त

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका हद्दीत धोकादायक प्लास्टिक वापराला प्रतिबंध असूनही छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडून मात्र प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाचे वर्षभरात शहरात तब्बल साडेचार हजार किलो प्लास्टिक जप्त करत कारवाई केली आहे. याप्रकरणी 38 लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. पूर्व, पश्चिम, नाशिकरोड, नवीन नाशिक, पंचवटी व सातपूर या सहाही विभागांतील विभागीय स्वच्छता निरीक्षक तसेच स्वच्छता निरीक्षकांच्या पथकामार्फत ही मोहीम सुरू आहे.
केंद्रीय पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्देशांनुसार एकल प्लास्टिकचा वापर, विक्री व साठ्यावर बंदी घालण्यात आली आहे. एकल प्लास्टिकचा वापर, विक्री व साठा करणार्‍यांविरोधात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत एप्रिल 2024 ते एप्रिल 2025 या तेरा महिन्यांच्या कालावधीत 753 ठिकाणी कारवाई करून 38 लाख 25 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. घनकचरा विभागाकडून शहरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सहा स्वतंत्र पथके तयार केली असून, दंडात्मक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 753 जणांविरोधात कारवाई करून 38 लाख 25 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्लास्टिक कचर्‍यामुळे निर्माण होणार्‍या विविध समस्या व त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पालिकेकडून कारवाई केली जाते.

नाशिक शहर प्लास्टिकमुक्त करण्याचे ध्येय आहे. दंडात्मक कारवाईवर भर न देता प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर होणार नाही, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायचा आहे.
-अजित निकत, संचालक, घनकचरा विभाग, मनपा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *