बांधकाम साइटवरून लोखंडी प्लेटा, साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहरासह तालुक्यातील विविध गावांतील बांधकाम साइटवरून लोखंडी प्लेटा व साहित्य चोरी करणार्‍या टोळीस जेरबंद करण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांनी सिन्नर शहरातील उद्योगभवन, नांदूरशिंगोटे, निर्‍हाळे, मर्‍हळ, मुसळगाव या ठिकाणांवरून नवीन बांधकाम साइटवरून आर.सी.सी. कामाचे साहित्य चोरी केले असल्याची कबुली दिली आहे.

सूरज ज्ञानेश्वर घेगडमल (27, रा. महालक्ष्मीनगर, झापवाडीरोड, सिन्नर), भारत सुरेश बर्डे (31, रा. वावीवेस, सिन्नर) व संकेत अरुण बारवकर (27, रा. गंगोत्रीनगर, सरदवाडीरोड, सिन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा, यासाठी पोलीस ठाणेनिहाय आढावा घेऊन गुन्हेगारांचे सध्याच्या ठावठिकाणांबाबत माहिती घेण्यास पोलीस पथकांना सूचना दिल्या आहेत.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या गुन्ह्यांमधील आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. सिन्नर बायपास रोडवर मनेगाव शिवारात आर.सी.सी. कॉन्ट्रॅक्टर मंजुर आलम शेख यांच्या मालकीच्या आर. सी. सी. कामाचे लोखंडी प्लेटा, लोखंडी साहित्य व स्पॅनर असा एकूण 53 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरून नेला होता. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याचा सिन्नर पोलीस व नाशिक ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून, हा गुन्हा करणारे आरोपी हे एक सोनेरी रंगाच्या होंडा सिटी कारमध्ये आडवा फाटा, सिन्नर परिसरात येणार असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, नवनाथ सानप, विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून तिघा आरोपींना ताब्यात घेतले.

होंडा सिटी कारमधून केली चोरी

या संशयित चोरट्यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सिन्नर बायपास रोडवर मनेगाव शिवारात त्यांच्याकडील होंडा सिटी कारमध्ये जाऊन नवीन बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून आरसीसी कामासाठी वापरण्यात येणार्‍या लोखंडी प्लेटा व साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेले साहित्य संशयित सूरज घेगडमल याच्या मध्यस्थीने अंबड, नाशिक येथे भंगार बाजारात विक्री केल्याचे उघडकीस आलेे आहे. यातील आरोपींनी यापूर्वी या गुन्ह्यात वापरलेली होंडा सिटी कार क्र. एमएच 03 झेड 7203 हे वाहन जप्त करण्यात आले आहे. त्यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सिन्नर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, आरोपींकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *