सिन्नर ः प्रतिनिधी
प्राथमिक व माध्यमिकच शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सोमवारपासून (दि.16) सुरू होणार असून, तालुक्यात सर्वशिक्षा मोहिमेंतर्गत पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडारातून तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 36 हजार 835 पुस्तक संच प्राप्त झाले आहेत. यंदाही पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात सर्व विषयांची मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असल्याचे गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे यांनी सांगितले.पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात सर्व विषयांची मोफत पाठ्यपुस्तके मिळावी यासाठी पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून पाठ्यपुस्तकांचा शंभर टक्के पुरवठा करण्यात आला आहे.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. ही पुस्तके विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मिळण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाकडून नियोजन आखून संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांकडून पंचायत समिती शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये पुस्तके घेऊन जात आहेत.
यापूर्वी बालभारतीने एकत्रित किंवा एकात्मिक पाठ्यपुस्तके छापण्याची पद्धत अवलंबली होती, दोन भागांमध्ये विषयांची पुस्तके दिली जात होती. त्यात काही पाने कोरी सोडण्यात येत होती. मात्र नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी यंदा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पुस्तके छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने या बदलाला मंजुरी दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तक मिळेल, ज्यामुळे अभ्यास करणे अधिक सोपे आणि व्यवस्थित होईल. या नव्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना विषयांचा सखोल अभ्यास करता येईल आणि शिक्षकांनाही शिकवणे सुलभ होईल. हा बदल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लाभदायक ठरेल, अशी अपेक्षा आहे.
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला 100 टक्के पुस्तकांचे संच प्राप्त झाले असून त्याची वितरण व्यवस्थाही गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली आहे. मराठी आणि उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यात श्रीमती रुपाली पगार यांनी विषय प्रमुख म्हणून कामकाज केले असून विजय कुर्हे तालुका समन्वयक म्हणून कामकाज केले तर वितरण कामकाजासाठी बी.आर.सी. विशेष शिक्षक व विषय तज्ज्ञ यांनी मोलाचे योगदान दिले आहे.