ना. भुसेंच्या दौर्यासाठी जि. प. प्रशासन लागले कामाला
नाशिक ः प्रतिनिधी
‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ या म्हणीचा प्रत्यय जिल्हा परिषदेतील स्वच्छतागृहांकडे पाहिल्यावर येतो. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत सर्व विभागांच्या कार्याचा आढावा तसेच कार्यालयातील स्वच्छता, अभ्यागतांना पाणी, बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. 15 जानेवारी ते 1 मेपर्यंत शंभर दिवस कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात आली.
जिल्हा परिषदेला पुरस्कारदेखील मिळाला. परंतु, हा कृती कार्यक्रम संपला अन् जिल्हा परिषदेत पुन्हा ये रे माझ्या मागल्या, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता आज पुन्हा शिक्षणमंत्री दादा भुसे हे जिल्हा परिषदेत आढावा घेणार असल्याने जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा झाडून पुसून कामाला लागली आहे. एरवी दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करणारे कर्मचारी, अधिकारी अन् जिल्हा परिषदेत कामासाठी येणारे अभ्यागत हेदेखील संबंधित विभागाची तत्परता पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.
राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे आज जिल्हा परिषदेला भेट देणार आहेत. यापूर्वीही दोन वेळा भुसे यांची भेट ठरली होती. परंतु, या भेटीला अडचणी आल्या अन् भुसेंचे पाय काही जिल्हा परिषदेला लागले नाहीत. भुसे शिक्षण विभागाला भेट देणार असल्याने मागील दोन्ही वेळेस माहितीफलकाची तसेच जिन्याजवळील कोपर्यांची स्वच्छता करण्यात आली होती.
हा स्वच्छतेचा फार्स केवळ मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आल्यावरच केला जातो. इतर वेळी मात्र कचरा, गुटख्याने रंगलेल्या भिंती, दुर्गंधी अशा
घाणेरड्या वातावरणात कर्मचारी आणि अधिकार्यांना काम करावे लागते.
अस्वच्छता झाकण्यासाठी फलकाचा जुगाड
आरोग्य विभागाकडून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये म्हणून विविध योजना राबविल्या जातात. परंतु, मुख्यालयातील विभागच आजारी असल्याचे दिसून येत आहे. जिन्यातील कोपर्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, कोपरा झाकण्यासाठी कोपर्यात फलक उभा करून घाणीचे साम्राज्य लपविण्याचा जुगाड आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी केला आहे. जि. प. मुख्यालयात कायम अभ्यागतांबरोबरच कर्मचार्यांना नेहमीच दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. आपली कामे करावी लागत असल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्वच्छतेसाठी आग्रही असलेल्या आरेाग्य विभागासह इतर विभागांतील दुर्गंधी आणि कचर्याच्या सान्निध्यात काम करावे लागत आहे. आज शिक्षणमंत्री जि.प. मुख्यालयात भेट देणार आहेत. एकीकडे स्वच्छता मोहीम राबविताना मुख्यालयातील स्वच्छतेकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्वच्छतागृहाची अवस्था शोचनीय
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील स्वच्छतागृहांची अवस्था शोचनीय झालेली आहे. स्वच्छतागृहांतील दुर्गंधीमुळे अभ्यागत, कर्मचार्यांना नाकाला रुमाल लावूनच जावे लागत आहे. दिवसातून एकदा स्वच्छता कर्मचारी येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दिवसभर हजारो नागरिक विविध कामांसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात भेट देत असतात. दुर्गंधीमुळे कर्मचारी आणि येणार्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जेव्हा कोणी प्रशासकीय अधिकारी, मंत्री वा महत्त्वाच्या व्यक्ती जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात येणार असेल, अशा वेळी तात्पुरती स्वच्छता केली जाते. आज शिक्षणमंत्री दादाजी भुसे भेट देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर माहितीफलक, स्वच्छता करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त प्रशासनाकडून रात्रीचा दिवस करून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असतानाही स्वच्छतागृहांची अवस्था वाईट होती. जि.प. मुख्यालयात गेल्या वर्षी एक जानेवारीला आढावा बैठकीसाठी विभागीय आयुक्तांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर डागडुजी आणि स्वच्छता मोहीम राबविली होती.