सामाजिक संवेदना

माणसाच्या सामाजिक संवेदना जाग्या असल्या तर तो स्वतःचा राहत नाही तर समाजाचा होऊन जातो. ‘हे विश्‍वची माझे घर’ या उक्तीप्रमाणे हा समाज हेच त्याचे कुटुंब बनते आणि समाजाचे सुख-दुःख हे त्याचे सुख-दुःख बनते. पण, हे सर्व करत असताना त्याला फार मोठा संयम ठेवावा लागतो. लोकांचा विरोध, दूषणे सहन करत आपले सामाजिक कार्य पुढे न्यावे लागते. त्यासाठी फार मोठा सकारात्मक दृष्टिकोन मनात ठेवावा लागतो. प्रसंगी अनेक प्रकारची संकटे, विरोध, गैरसोयी, अपमान सहन करावा लागतो. मनात मातृत्वाचा, प्रेमाचा झरा कायम जागा ठेवावा लागतो, तेव्हाच आपण परक्यांनाही आपलंसं करू शकतो. याचे आदर्श उदाहरण म्हणजे लासलगावजवळील पिंपळगाव नजीक येथील जय जनार्दन स्वामी अनाथ व वृद्धाश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ व सौ.संगीता गुंजाळ हे दाम्पत्य. वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त येथील आश्रमात जाण्याचा योग आला. ‘ज्याला नाही कुणी त्याला आहोत आम्ही’ याप्रमाणे वयोवृद्धांपासून ते अगदी काही महिन्यांच्या बालकांपर्यंत तसेच अपंगांपासून ते गतिमंद अशा मुलांचं पालकत्व हे दाम्पत्य अगदी मनापासून पेलत अणि झेलत आहे. त्या त्या वयोगटाप्रमाणे मुलांना शाळेत दाखल केलेले आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी ते रात्रंदिवस झटत आहेत. येथील सर्व बालकांचे ते हक्काचे आई-बाबा झालेले आहेत. मुलांच्या प्रगतीचा आलेख बघून गुंजाळ दाम्पत्य सुखावत आहे. जन्माला आल्यापासून सांभाळलेली त्यांच्या आश्रमातील दुर्गा नावाची मुलगी आता इयत्ता चौथीला आहे. नुकतीच ती स्केटिंग या खेळ प्रकारात राज्यस्तरावर खेळण्यासाठी गेलेली होती. गुंजाळ सर किती प्रेमाने आपल्या या मुलीचा व्हिडिओ आम्हाला दाखवत होते. मुलीबद्दलचा अभिमान त्यांच्या मनात मावत नव्हता. गुंजाळ ताई सांगत होत्या की, जन्माला येताना फक्त सातशे ग्रॅमची या मुलीला प्राणपणाने जपले. सहा महिन्यांनंतर तिचे पालकत्व घेण्यासाठी अनेक पालक पुढे आले, पण तिच्यात इतका जीव गुंतला की काळजाचा तुकडाच बनली. नाही देऊ शकलो आम्ही तिला कुणाकडे. सर्व मुलं आमचीच आहे ही भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होती. आतापर्यंत ब्यान्नव मुलींचे कन्यादान त्यांनी केलेले आहे. शिवाय लग्नानंतर या मुलींचे सर्व माहेरपण सौ. गुंजाळताईच करतात. माहेरपणाला आलेल्या त्यांच्या एका मुलीने गोंडस बाळाला जन्म दिला. आईच्या मायेने त्या मुलीची व बाळाची काळजी घेताना दिसून आल्या.
स्वतःची मुलं काळजी घेत नाही इतक्या प्रेमाने वृद्धांची काळजी, त्यांची आजारपणात सेवा ते करतात.
स्वतःच्या मुलांनाही त्या या मुलांसोबतच वाढवत आहे. आपलं- परक असा भेदभाव अजिबात नाही. मुलं आणि मुली त्यांनी प्रत्येक कामात तरबेज केलेली आहेत. आलेल्या अतिथींचे स्वागत, चहापान आणि इतर सर्व कामे शिस्तबद्धपणे करतात. शिवाय भारतीय संस्कृतीप्रमाणे चांगले संस्कार व्हावेत म्हणून रोज रात्री हरिपाठ, अभंग, भजन होते. सर्वजण त्यात तल्लीनतेने सहभागी होतात. पालन-पोषणाबरोबरच चांगले संस्कार देण्याचे काम तिथे केले जाते. अध्यात्माचा वारसा त्यांनी मुलांमध्ये रुजवला आहे आणि त्यांची काही मुले कीर्तन, प्रवचनासाठी तयार झाली आहेत. काहीजण संगणक खेळाच्या विविध प्रकारात प्रावीण्य मिळवत आहे.
श्री. व सौ. गुंजाळ दाम्पत्य स्वतः उच्चविद्याविभूषित आहे. गुंजाळ सरांनी शिक्षकी पेशाची नोकरी सोडून गेली अठरा वर्षे ते समाजसेवेचे हे कार्य करत आहेत. संकटाचे अनेक डोंगर झेलत त्यांचे हे कार्य अविरतपणे चालू आहे. त्यांना गुंजाळताईंची तितकीच खंबीर साथ लाभली आहे. मनाचा मोठेपणा आणि सामाजिक संवेदना ज्यांच्या जागी आहे त्याच व्यक्ती असे महान कार्य करू शकतात आणि तरीही त्या कार्याचा कुठेही गाजावाजा नाही. आपण समाजाचे देणे लागतो ही एकमेव भावना जागी ठेवून आपलं कार्य त्यांनी सुरू ठेवले आहे. त्यांच्या कार्याला खरोखर मनोमनी सलाम!
-सविता दिवटे-चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *