सिन्नर-ठाणगाव रोडवर बाभळीचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प

ठाणगाव ः वार्ताहर
सिन्नर-ठाणगाव रोडवरील घोडेवाल्याचा मळा येथे गुरुवारी (दि.12) रात्री नऊ वाजता वादळी वार्‍यासह मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेले बाभळीचे झाड उन्मळून पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
रात्री येणार्‍या-जाणार्‍यांना पर्यायी मार्ग नसल्याने डुबेरे येथे येऊन सोनारी, आडवाडीमार्गे ठाणगावमध्ये आले. दुसर्‍या दिवशी ठाणगाववरून जाणार्‍या सर्व मुक्कामी गाड्या ठाणगाव, कोकणवाडी, खिरविरा, आडवाडीमार्गे सिन्नरकडे मार्गस्थ झाल्या. औद्योगिक वसाहतींमध्ये कामाला जाणार्‍या कामगारांना सकाळी नऊ वाजेपर्यंत रस्त्यावर पडलेल्या बाभळीमुळे पुढे जाता येत नव्हते. अखेर स्थानिक नागरिकांनी कटर मशिन आणून झाड कट केले. वाहनधारकांनी त्यांना मदत केली व रस्ता मोकळा केला. तोपर्यंत सिन्नरून येणार्‍या गाड्या व ठाणगाव परिसरातून जाणार्‍या सर्व वाहनांच्या दोेन्ही बाजूंनी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हळूहळू रस्ता मोकळा होत गेला व तिथून पुढे वाहतूक सुरळीत झाली.
ठाणगाव-सिन्नर रोडवर असे अनेक धोकादायक झाडे आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात एका पिकअपवरही झाड कोसळले होते. संबंधित विभागाने याची गंभीर दखल घेऊन रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडे काढून टाकावीत, अशी मागणी वाहनधारकांसह प्रवाशांनी केली आहे.
दरम्यान, ठाणगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. रात्री आठ वाजता वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी सात वाजताच सुरू होतो. त्याचा गंभीर परिणाम वीजग्राहकांबरोबरच पाचगाव पाणीपुरवठा योजनेवरसुद्धा झालेला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *