पगारे यांचा रासायनिक खतांना फाटा देत अनोखा प्रयोग
अस्वली स्टेशन : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील धामणी गावातील नंदू पगारे (वय 6) या ज्येष्ठ शेतकर्याने रासायनिक खतांना कायमचा फाटा देत एक एकर दहा गुंठ्यात सेंद्रिय खत म्हणून उपयोगात येणार्या ताग पिकाची यशस्वी लागवड केली आहे.
खरिपात भात आवणीच्या वेळी शेतात चिखल करून या सेंद्रिय तागाचे कंपोस्ट केले जाते व भाताची पुनर्लागवड केली जाते. सहाय्यक कृषी अधिकारी रमेश वाडेकर मार्गदर्शन करतात. हिरवळीचे खत म्हणून ओळख असलेल्या ताग हा सेंद्रिय शेती करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. भात पेरणीप्रमाणेच तागाच्या बियाण्यांची पेरणी केली जाते. कमी खर्चात होत असलेल्या या शेतीसाठी फक्त मशागतीसाठी ट्रॅक्टरचा खर्च येतो. येथील ज्येष्ठ शेतकर्याने गेल्या आठ-नऊ वर्षांपासून रासायनिक खतांना फाटा देऊन सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्याचे दिसते. रब्बी व इतर हंगामातदेखील ताग पिकाचा
सेंद्रिय खत म्हणून उपयोग केला जातो.
पावसाळ्यात तागाला हिरवळ खत म्हणून बघितले जाते. सुतळी बनविण्यासाठी ताग उपयोगात येतो. काही शेतकरी तागापासून बियाणे बनवून विक्री करतात. शेतात पीक लावल्यापासून साधारण दीड ते दोन महिन्यांनी ते येते. त्यावर पिवळी
फुले येतात.
या पिकाला कीड व रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्याने ताग लागवडही कमी खर्चात केली जाते. पगारे यांनी तागाचे बियाणे घोटीहून भाऊसाहेब सदगीर यांच्या कन्हय्या कृषी सेवा केंद्रातून आणले. त्यानंतर लागवड करून पीक आता चांगलेच बहरले आहे. पगारे यांचा मोठा मुलगा साहेबराव विक्रीकर विभागात अधिकारी आहे. दुसरा मुलगा श्रीधर एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक आहे. मुलगी आरती नितीन जाधव एलएल.बी. झाल्या आहेत. मुले चांगल्या हुद्द्यावर आहेत. शेतकरी नंदूपगारे यांचे वय 66 असूनही ते निरोगी आहेत. आपल्या काळ्या आईची सेवा करत विषमुक्त शेती करण्याचा संदेश देत आहेत. प्रत्येकाने विषमुक्त शेती करावी व आपले आरोग्य जपावे. पिकाचे संतुलन राखण्यासाठी ही विषमुक्त शेती मानवी जीवनाला अतिशय आरोग्यदायी आहे. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारतो. सेंद्रिय शेतीबाबत इगतपुरी तालुका कृषी विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते, असेे पगारे यांनी सांगितले.
हिरवळीचे खत ताग वातावरणातील नत्र शोषून घेते. 35 ते 40 दिवसांनंतर फुलोरा आल्यानंतर लगेच जमिनीत गाडून टाकायचा असतो. त्यामुळे आपल्याला पुढील पिकांसाठी नत्र उपलब्ध होतो. जमिनीचा पोत सुधारतो, तसेच सेंद्रिय कर्ब वाढतो.
– रमेश वाडेकर, सहाय्यक कृषी अधिकारी