मृतांची संख्या 265, महाराष्ट्रातील 16 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांची घटनास्थळी भेट
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या बोईंग विमान दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (डीजीसीए) बोईंग 787-8/9 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश दिले आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डीजीसीएने एअर इंडिया कंपनीच्या बोईंग 787-8/9 विमानांच्या ताफ्यावर अतिरिक्त देखभाल आणि तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. 15 जून 2025 पासून भारतातून उड्डाण करण्यापूर्वी प्रत्येक विमानाची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या बोईंग कंपनीच्या विमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक दाखले देत ह्या विमानाच्या सुरक्षिततेवर आणि त्याच्या उड्डाणावर, तांत्रिक बाबींवर चर्चा होत आहेत. बोईंग कंपनीविरुद्ध गेल्या काही वर्षांत अनेक तक्रारी आल्या आहेत. डीजीसीएने एअर इंडियाला सुरक्षा उपाययोजनांबाबत अनेक पत्रे लिहिली होती. अमेरिकन सरकार आणि संसदेनेही या प्रकरणाची चौकशी केली आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माजी सहसचिव सनत कौल यांनी दिली आहे. त्यामुळे आता एअर इंडियाकडून तपासणीसंदर्भातला रिपोर्ट डीजीसीएला सुपूर्द करावा लागणार आहे. डीजीसीएने एअर इंडियाला लिहिलेल्या पत्रात एअर इंडियाच्या देखभाल आणि तपासणी प्रक्रियेबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत.
या विमान अपघातात एकून 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील 16 जणांचा समावेश आहे. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती, इरफान शेख या क्रू मेंबर्सचा समावेश आहे. त्याशिवाय मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे.
विमान दुर्घटनेतील पायलट सुमित सभ्रवाल हे पवईच्या जलवायू विहार इमारतीमध्ये त्यांच्या वडिलांसह राहतात. बदलापुरातील रहिवाशी आणि एअर इंडियाचा क्रू मेंबर दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे दुपारी विमानात जाण्यापूर्वीच त्याचे आईशी फोनवरून बोलणे झाले होते. दीपकचे चार वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. पनवेल तालुक्यातील न्हावा गावची क्रू मेंबर्समध्ये हवाईसुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचाही मृत्यू झाला आहे. मैथालीच्या पश्चात आई-वडील, बहिण-भाऊ असा परिवार आहे. डोंबिवलीतील एअर इंडिया केबिन क्रू रोशनी सोनघरे हिचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. चार दिवसांपूर्वी ती गावी आली होती.
या विमान दुर्घटनेमध्ये श्रद्धा धवन हिचा देखील मृत्यू झाला आहे. श्रद्धा ही एअर इंडियामध्ये सीनियर ग्रुप मेंबर होती. तिचा पती राजेश हा देखील एअर इंडियामध्येच कामाला आहे. कल्पना याच्यापेक्षा तिचा पती मुलगी आणि सासू-सासरे असा परिवार आहे. ड्युटी जॉईन करण्यापूर्वी श्रद्धाने आपल्या घरच्यांना फोन करून आपण लवकरच भेटू असे सांगितले होते. इरफान शेख या 22 वर्षीय क्यू मेंबरचा ही दुदैवी अंत झाला आहे. इरफान हा पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरमध्ये राहायला होता. दोन वर्षापासून तो एअर इंडिया मध्ये कामाला लागला होता. क्रू असणार्या अपर्णा महाडिक यांचाही मृ्त्यू झाला आहे. अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या, अमोल देखील स्वतः एअर इंडियामध्ये पायलट आहेत.
अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
अपघातग्रस्त विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजेच ब्लॅक बॉक्स सापडला आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधून अपघाताआधीची महत्त्वपूर्ण माहिती समजणार आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधून अपघाताआधी माहिती समजणार आहे. दोनपैकी एक ब्लॅक बॉक्स सापडला. दुसर्याचा शोध सुरू आहे. ब्लॅक बॉक्स सापडल्याने अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार आहे. विश्लेषणासाठी हा ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आला आहे.
सांगोल्यातील दोघांचा मृत्यू
विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले महादेव तुकाराम पवार (वय 67) आणि त्यांच्या पत्नी अशा (वय 55) हे दोघे सांगोला तालुक्यातील हातीद गावचे मूळ रहिवासी आहेत. त्यांचा एक मुलगा अहमदाबादमध्ये, तर दुसरा लंडनमध्ये बेकरीचा व्यवसाय करत असल्याने ते सध्या अहमदाबाद येथे स्थायिक झाले आहेत. आपल्या लंडनच्या मुलाला भेटण्यासाठी हे दोघे लंडनला चालले होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, मुलगी, दोन मुले आहेत.
दुर्घटनेची संभाव्य चार कारणे?
विमानाच्या दोन्ही इंजिनांत एकाच वेळी बिघाड झाला असावा.
लँडिंग गिअर टाकता आला नसावा, जो वेग कमी करतो.
पक्ष्याची विमानाला धडक बसली असावी.
टेकऑफला मदत करणारे विमानाच्या पंखांचे फ्लॅप खाली केलेल्या स्थितीतच राहिले असावेत.
डीजीसीएचे निर्देश
15 जून 2025 पासून भारतातून उड्डाण करण्यापूर्वी प्रत्येक
विमानाची तपासणी बंधनकारक.
इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग आणि संबंधित प्रणालींची तपासणी
केबिन एअर कंप्रेसर आणि संबंधित यंत्रणांची तपासणी
इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टिम चाचणी
इंधनचालित अॅक्युएटर व फ्युएल सिस्टिम तपासणी
हायड्रॉलिक प्रणालीची सेवा स्थिती तपासणी
टेकऑफ पॅरामीटर्सचा आढावा
‘फ्लाइट कंट्रोल इन्स्पेक्शन’ ही प्रणाली तात्पुरत्या कालावधीत दरम्यानच्या तपासणीत समाविष्ट केली जाणार आहे.
पॉवर अॅश्युरन्स चेक पुढील दोन आठवड्यांत पूर्ण करणे आवश्यक.
मागील 15 दिवसांत झालेल्या तांत्रिक बिघाडांच्या पुनरावलोकनानंतरच देखभाल प्रक्रिया पूर्ण समजली जाईल.