जीवितहानीचा धोका; प्रशासनाचे दुर्लक्ष धक्कादायक

वडाळागाव : प्रतिनिधी
साईनाथनगर व सुचितानगर जॉगिंग ट्रॅकच्या बाजूने असलेल्या श्री संत सावता माळी मार्गावरील जुने कुजलेले, धोकादायक, वाळलेले, तसेच वाकलेली झाडे नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरत आहेत.
एक झाड रस्त्याच्या अगदी मध्यभागी असून, ते जंगली प्रजातीचे आहे व सध्या पूर्णपणे वाकलेले आणि अस्थिर झालेले आहे. विशेष म्हणजे नाशिक महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वीच या परिसरात रस्त्याचे रुंदीकरण केले होते. मात्र, या झाडाची कोणतीही पाहणी न करता काम पूर्ण करण्यात आले. परिणामी, हे झाड अजूनही तिथेच उभे आहे, जे की रस्त्याने जाणार्‍या वाहनचालक व पादचार्‍यांसाठी सातत्याने धोकादायक बनले आहे. सध्या पावसाळा सुरू असून, जोरदार वार्‍यांमुळे झाड कोसळण्याची शक्यता दाट आहे.
या भागात नागरिकांनी यापूर्वीही याबाबत लेखी तक्रार नोंदवली होती, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. हे झाड कोसळल्यास मोठा अपघात होण्याची, तसेच जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या झाडाची तातडीने पाहणी करून त्याची छाटणी करण्यात यावी, जेणेकरून संभाव्य दुर्घटना टाळता येईल व रस्त्यावर पुरेसा प्रकाश पडून गुन्हेगारीस आळा बसेल. प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन कार्यवाही करावी, अन्यथा अपघात घडल्यानंतर उपाययोजना केल्याचा निषेध होईल.

महानगरपालिकेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी झाडांची तपासणी करून अशा धोकादायक झाडांचे योग्यरीत्या छाटणी व काढणी करणे आवश्यक आहे. वेळेवर पावले उचलली नाहीत, तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
– संदीप जगझाप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, ओबीसी विभाग, नाशिक जिल्हाध्यक्ष

उद्यान अधिकारी, मनपा आणि विभागीय आयुक्त यांना धोकादायक, वाळलेले, कुजलेले तसेच वाकलेल्या झाडांचा योग्य तो बंदोबस्त करण्याबाबत लेखी अर्ज देऊनही कार्यवाही केली जात नाही.
– रमेश गायकवाड, नागरिक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *