’नाफेड’ची कांदा खरेदी लांबणार, दरही वाढणार?

प्रत्येक सोसायटीला लाखाची बँक गॅरंटी द्यावी लागणार

निफाड ः तालुका प्रतिनिधी
नाफेडच्या कांदा खरेदीसाठी ज्या पंधरा विकास सोसायट्यांना प्राधान्य देण्यात आले आहे, त्या प्रत्येक सोसायटीला कांदा खरेदीपूर्वी हजार टन कांदा खरेदीसाठी लाख रुपयाची बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे. त्यामुळे या बँक गॅरंटीसाठी संबंधित सोसायट्यांची बँकेत धावपळ सुरू आहे. त्यामुळे नाफेडच्या कांदा खरेदीसाठी जुलै उजाडू शकतो किंवा निम्मा जुलै महिना संपू शकतो.
त्यातच यावर्षी सतत सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा सडल्याने पुढे हाच कांदा 2500 ते 3000 रुपये दराने विकला जाईल, अशी शेतकर्‍यांना आशा आहे. साहजिकच भाव वाढतील त्यावेळेस
नाफेडलादेखील त्याप्रमाणात असणार्‍या भावाने कांदा खरेदी करावी लागेल, असे जाणकारांचे मत आहे. सध्या नाफेडचा कांदा घोटाळा चांगलाच गाजत आहे. साहजिकच या घोटाळ्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकारीदेखील घाबरलेे आहेत. कारण या घोटाळ्यात काही अधिकारी तसेच अडते आणि एजन्सी अडकल्या आहेत. यातील अनेक सेवानिवृत्त झाले, तर काहींनी नोकर्‍या सोडून दिल्या आहेत. काही दलालदेखील यात अडकले असल्याचे समजते. या सर्वांवर आरोपपत्र दाखल आहे.अशा परिस्थितीत आता नाफेडमार्फत कांदा खरेदी करावयाची झाल्यास पोर्टलवर रजिस्टेशन होणे गरजेचे आहे. मात्र, सध्या दोन-तीन दिवसांपासून महानिर्लेखनाचे काम सुरू असल्याने हे पोर्टल बंद होते. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना 7/12 उतारा डाउनलोड करता आला नाही. ज्यांनी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले किंवा 7/12 उतारा दिला त्यांची पडताळणी केली जाणार आहे. पडताळणीत 7/12 उतार्‍यावर विक्री होणार्‍या कांदा पिकाची नोंद आहे का आणि असेल तर संबंधित शेतकर्‍याला त्याचे बँक खात्याला आधारकार्ड तसेच 7/12 उतारा लिंक करावा लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच नाफेड अथवा कांदा खरेदी करणारी संबंधित एजन्सी अशा शेतकर्‍यांचा कांदा खरेदी करणार आहे. त्यातही मागील वर्षी नाफेडच्या या पोर्टलला सात हजार शेतकरी जोडले गेलेले होते. त्यांचे काय करायचे हादेखील प्रश्न आहे. सध्याच्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांनी चाळीत साठविलेला कांदा खराब होण्याची शक्यता आहे. सध्या कांदा भाव वाढण्याची गती बघता पुढील महिन्यापर्यंत कांदा 2500 रुपये प्रतिक्विंटल भावाने विक्री होईल, अशी शेतकर्‍यांना आशा आहे. त्यामुळे नाफेडची खरेदीदेखील 22 ते 25 रुपये किलोप्रमाणे होऊ शकते, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. यावर्षी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असले, तरी पावसामुळे कांद्याचे नुकसानदेखील तेवढेच मोठ्या प्रमाणात झाले आहे. आज ज्या शेतकर्‍यांकडे कांदा आहे त्यास पुढे निश्चित भाव मिळेेल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे.
अद्याप पिंपळगावमध्येही नाफेडने कांदा खरेदी सुरू केलेली नाही. कारण सध्या गाजत असलेल्या कांदा घोटाळ्यामुळे अधिकारीदेखील कागदपत्रांची पूर्ण तपासणी करून मगच परवानगी देऊ लागले आहेत. ज्या सोसायट्यांना कांदा खरेदीची परवानगी मिळाली त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात गुंतल्या आहेत. पुढील महिन्यापासून नाफेडची खरेदी सुरू होईल, असा अंदाज आज दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *