अज्ञाताविरुद्ध तक्रार; पोलिसपाटील, तलाठ्यांकडून पाहणी
निफाड ः विशेष प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील श्रीरामनगर येथील कांदा उत्पादक शेतकरी सोमनाथ सखाराम शिंदे यांच्या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने हेतुपुरस्सर युरिया टाकून नुकसानीचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गाजवळ व निफाड शिवारालगत सोमनाथ शिंदे यांनी मोठ्या कष्टाने रब्बी उन्हाळ कांदा पिकविला आहे. कांद्याला भाव कमी असल्याने जवळपास तीनशे क्विंटल कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. उन्हाळ कांदा विक्रीतून आर्थिक फायदा व्हावा, या हेतूने कांद्याची साठवणूक केली आहे. मात्र, सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीने तीनशे क्विंटल कांदा साठविलेल्या कांदा चाळीवर युरिया फेकून नुकसानीचा प्रयत्न कृतीतून व्यक्त केला आहे. कांदा उत्पादक शेतकरी शिंदे यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी श्रीरामनगरचे पोलिसपाटील रवींद्र शिंदे यांना माहिती दिली. प्रत्यक्ष पाहणीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध निफाड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. निफाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन सांगळे यांनी प्रत्यक्ष कांदाचाळीची पाहणी करून पुढील तपास करीत आहेत. श्रीरामनगरचे तलाठी आईटवार, निफाडचे तलाठी खडांगळे यांनी कांदा चाळीला भेट देऊन पाहणी केली.
कांदा पिकाच्या उत्पादनासाठी मोठा खर्च झाला आहे. कांदे काढल्यानंतर मार्केटमध्ये कांद्याला योग्य भाव पाहिजे, असे बाजारभाव नसल्याने कुटुंबाच्या विचाराने कांदा चाळीत साठवण्याचा निर्णय घेतला. आता ज्या भागात अज्ञात व्यक्तीने युरिया टाकून नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे. तेथील कांदा कोणत्याही परिस्थितीत मिळेल, त्या बाजारभावात विकावा लागणार आहे.
– सोमनाथ शिंदे, कांदा उत्पादक, श्रीरामनगर