देशवंडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

अर्ध्या तासात बिबट्या पिंजर्‍यात, मोहदरी उद्यानात हलवले

सिन्नर : प्रतिनिधी
विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी रेस्क्यू ऑपरेशन करत जीवदान दिल्याची घटना तालुक्यातील देशवंडी येथे घडली. बुधवारी (दि.25) पहाटे हा मादी बिबट्या विहिरीत पडला होता. सकाळी साडेआठ वाजता त्याला विहिरीत पिंजरा टाकून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
देशवंडी येथील मधुकर कापडी यांच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या पडला होता. बुधवारी सकाळी कापडी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विद्युत पंपाच्या पाईपला पकडलेल्या अवस्थेत बिबट्या निदर्शनास पडला. त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर उप वनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खैरनार, सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. दोरखंडांच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला.
पिंजर्‍याचे दार उघडताच पाण्यात पोहून थकलेल्या बिबट्याने पिंजर्‍यात जाणे पसंत केले. त्यानंतर दरवाजा बंद करून पिंजरा विहिरी बाहेर काढण्यात आला. वनपाल सुजित बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नरचे वनरक्षक संतोष चव्हाण, वडगाव पिंगळाचे वनरक्षक गोविंद पंढरी, देशवंडीचे वनरक्षक संजय गीते, निसर्गमित्र निखिल वैद्य, रोशन जाधव यांनी बिबट्याला विहिरीत पिंजरा सोडून रेस्क्यू केले. त्यास सिन्नरच्या वन उद्यानात सुरक्षितरित्या हलविण्यात आले. देशवंडी गावच्या सरपंच, पोलीसपाटील तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

मदतकार्य वेळेत मिळाल्याने वाचला जीव

दोन वर्षे वयाची बिबट्याची मादी पहाटेच्या सुमारास विहिरीत पडली असावी. विहिरीत पाणी असल्याने बिबट्याने बराच वेळ पाण्यात पोहून आपला जीव वाचवला. थकल्यानंतर मात्र त्याने विद्युत पंपाचा पाइप पकडून ठेवला. वजनामुळे आणि बिबट्याने पायाने पकडल्याने पाइप तुटण्याच्या स्थितीत होता. मात्र, त्यापूर्वीच मदत मिळाल्याने बिबट्याचे प्राण वाचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *