आषाढस्य प्रथमदिवसे… हा संस्कृत कवी कुलगुरू कालिदास यांच्या ‘मेघदूतम्’ या काव्याचा प्रारंभिक श्लोक आहे. आणि आषाढातील पहिला दिवस हा कवी कालिदास यांचा जयंती दिवस असतो. या श्लोकात कालिदासांनी आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी आकाशात उमटलेल्या काळ्याशार मेघाचे दर्शन किती सुंदर व रसयुक्त पद्धतीने केले आहे, हे अनुभवायला मिळते. मूळ संस्कृत श्लोक पुढीलप्रमाणे..
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।
अन्तर्बाष्पश्च विरहदुखेन क्लमं राजवक्त्रं
पीताम्भोजं न भवति पयःस्थं मनो मेघदूतम् ॥
याचा सरळ मराठी अर्थ, आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी, एक विरही यक्ष दुरून पाहतो, पर्वतांच्या शिखरांना आलिंगन देणारा काळा मेघ, जणू एखादा राजहस्ती डोंगरावर खेळतोय! यक्षाच्या डोळ्यांत विरहाने पाणी भरलं आहे, त्याचं मन अत्यंत व्याकूळ आहे.
त्या मेघाकडे पाहून त्याच्या मनात विचार येतो: “हा मेघच का नाही जात माझ्या प्रियतमेपर्यंत दूत म्हणून?” हा संस्कृत साहित्यातील सर्वश्रेष्ठ निसर्गदृश्य वर्णनांपैकी एक मानला जातो. शृंगाररसातील ‘विरह’ रसाचा हा उत्कट आविष्कार आहे. काव्य प्रणय, विरह, शृंगाररसाने ओतप्रोत भरलेले आहे. मेघदत्त या काव्याचा विषयच खूप उत्कट आहे. एक यक्ष विरोध न केल्यामुळे कुबेराच्या कोपाने एका वर्षासाठी हिमालयात निर्वासित होतो. तो आपल्या पत्नीपासून दूर असतो. आषाढ महिन्यात पहिला मेघ आकाशात दिसतो, तेव्हा त्याचे मन विरहाने भरून येते. तो त्या मेघाला दूत बनवून आपल्या पत्नीला संदेश पाठवतो. हेच संपूर्ण काव्य!
भारतातील संस्कृत साहित्यरत्न कवी कालिदास यांचा जन्म इतिहासाला ज्ञात नाही. त्यांचा कालखंड ही निश्चित सांगता येत नाही. पण विविध उल्लेखावरून, अनेक अभ्यासकांच्या एकत्रीकरणातून त्यांचा कालखंड किमान 375 ते 500 हा मानला जातो. गुप्त राजवंशाचा सुवर्णकाळ होता. काली देवीचा दास म्हणून त्यांना कालिदास म्हटले जाते.
कालिदास हे उज्जयिनी (मध्य प्रदेश) येथे वास्तव्यास होते, जी तत्कालीन गुप्त साम्राज्याची राजधानी होती. ते सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य (द्वितीय) याचे दरबारी कवी होते. विक्रमादित्याच्या दरबारातील ‘नवरत्नां‘पैकी एक म्हणून त्यांचा उल्लेख आढळतो.
कालिदास यांच्याबद्दल लोककथांमध्ये त्यांना मूर्ख म्हटले गेले असले, तरी ऐतिहासिक दृष्टीने ते एक अत्यंत बुद्धिमान, वेद-पुराण-नाट्य-धर्मशास्त्र-निसर्गदर्शन यांचे गाढे अभ्यासक होते. त्यांच्या लेखनशैलीतून प्रकट होते की, ते संस्कृत भाषेचे विलक्षण प्रकांडपंडित होते. पण इतिहासाला त्यांच्या शिक्षणाविषयी कल्पना नाही. कालिदासांचा मृत्यू नेमका कसा वा कधी झाला हे निश्चित नाही; परंतु त्यांच्या मृत्यूनंतर शेकडो वर्षे, आजतागायत, संस्कृत साहित्य, भारतीय संस्कृती आणि नाट्यकलेचे सर्वोच्च शिखर म्हणून त्यांना वंदन केले जाते.
कालिदास यांची साहित्यसंपदा
कालिदास यांनी दोन संस्कृत महाकाव्ये लिहिली.
‘रघुवंशम्’मध्ये रघुकुळाची वंशावळ यात रामायणपूर्व व पश्चात कथांचा समावेश आहे. तर ‘कुमारसंभवम्’मध्ये शिव-पार्वती विवाह व कार्तिकेय जन्म यांचा विषय आहे.
कालिदासांनी तीन नाटके लिहिली. अभिज्ञानशाकुंतलम् यात शकुंतला- दुष्यंत यांची अप्रतिम प्रणयकथा आहे.विक्रमोर्वशीयम् या नाटकामध्ये राजा पुरुरवस आणि उर्वशीची प्रेमकथा आहे. मालविकाग्निमित्रम्मध्ये अग्निमित्र आणि मालविका यांची कथा आहे. खंडकाव्य प्रांतात त्यांचे विश्वविख्यात मेघदूतम् खंड काव्य आहे. विरही यक्ष मेघाला दूत बनवतो. प्रियकराला संदेश पाठवण्याची ही पहिली अफलातून कल्पना.
ऋतुसंहार या खंडकाव्यात सहा ऋतूंचं अत्यंत नयनरम्य वर्णन केलेले आहे.
साहित्य रसाचा मेरूमणी कालिदास
सप्त बेड्यांचे बंधन पाळणार्या आपल्या या भरतखंडात, जगातील प्रथम श्रेणीचा साहित्यातील सर्व रसांचा आपल्या नाट्य काव्यात गुंफण करणारा साहित्य म्हणजे कालिदास. एखादा पर्यटक अभ्यासक इंग्लंड युरोपात गेला असता व त्याच्या शेक्सपियरची काव्य दृष्टिपथास पडले असते! तर नक्कीच त्याने शेक्सपियरचे वर्णन, ‘इंग्लंड युरोपातील भारतीय कालिदास’ असेच केले असते. पण सप्त बेड्यांची बंधनातली समुद्रबेडी बंधन असल्याने असे इतिहासात घडले नाही. म्हणून आज आम्हाला कालिदास म्हणजे भारतीय शेक्सपियर असे परक्यांनी केलेली उपमा ऐकावी लागते. कवी कालिदासाची काव्य खंडकाव्य, नाटके यांचा मुळात अभ्यास केल्यास, संत तुलसीदास यांच्या ‘बाल रामाचे मुख हे बालरामासारखेच आहे’ या उक्तीप्रमाणे ‘कालिदास हे कालिदासासारखेच होते’ त्यांच्या साहित्यिक उंचीचा जगात कोणी नाही. हे निश्चित आपल्याला पटेल. इतर संस्कृत कवी कालिदासाचे गुणगान करताना म्हणतात,
कालिदासः कविः कस्य न प्रियतमो लोचनानाम् ?
यस्य काव्ये प्रभा तस्य सूर्योदयो नेव विस्मृत्यः ॥
अर्थात, कालिदास हा असा कवी आहे की,
जो प्रत्येकाच्या डोळ्यांना प्रिय आहे. जसे सूर्योदय विसरता येत नाही, तसेच त्याचे काव्य विसरता येत नाही. दुसरा संस्कृत कवी म्हणतो,
कालिदासकृतौ काव्ये यावन्नान्यत् प्रतिष्ठते। तावत् स्वर्गेऽपि सततं भारतं रमणीयतम् ॥
अर्थात, जोपर्यंत कालिदासाचे काव्य श्रेष्ठ मानले जाते, तोपर्यंत स्वर्गापेक्षाही भारत अधिक रमणीय आहे. प्रेमात सतत पडल्याने प्रिय व्यक्ती प्रेम पाशाच्या (गुंफणात) आणखी खोल जातो. कालिदासांच्या अभिज्ञानशाकुन्तलम्मधील हा श्लोक पाहा.
प्रियं प्रेक्ष्याह्लादं स्पृहयति च भूयो न विरमेत्
पुनर्नव्यत्वं च प्रणयवशगः प्रेम्णि नयति।
इति प्रेमस्वभावं विरहपरिकृष्टोऽपि जनय
न हि स्वच्छन्दानां प्रकृतिरुपदेष्टुं सकुशलम् ॥
अर्थात, प्रेम हे स्वभावतः अशा प्रकारचे असते की, प्रिय व्यक्तीचा पुन्हा अनुभव घेतल्यावर पुन्हा पुन्हा त्यात रमावेसे वाटते. विरहाने त्रस्त असूनही ते अधिक खोल होते.
‘कवी कुलगुरू’ हे उपविधान सार्थच
कालिदास हे एकमेव असे कवी आहेत ज्यांनी नाटक, महाकाव्य आणि खंडकाव्य या तिन्ही शाखांमध्ये अव्वल साहित्य निर्माण केले. रघुवंशम्, कुमारसंभवम् संस्कृतातील महाकाव्य असून, अभिज्ञानशाकुंतलम् व विक्रमोर्वशीयम् ही नाटके आहेत. खंडकाव्यात विश्व प्रसिद्ध मेघदूतम् व ऋतुसंहार आहेत.कविकुलाला दिशा देणारा, कालिदास हे अनेक पिढ्यांतील कवींना प्रेरणा देणारे ठरले. म्हणून ते केवळ कवी नव्हे, तर ‘कविवृत्तांताचे आदर्श मूर्तिमंत रूप’ मानले जातात. कालिदास यांना कविकुलगुरू म्हणतात कारण ते केवळ उत्तम कवी नव्हते, तर काव्यकलेचे आचार्य होते. त्यांनी कविवंशाला केवळ परंपरा नव्हे, तर दिशा, दृष्टिकोन आणि दिव्यता दिली.”
काव्य-नाट्य यांचे शिखर कालिदासांचे काव्य हे प्रकृतीचे चित्रण, नारीचे भावविश्व, शृंंगार, करुण, विरह, वीर या सर्व रसांचा गाभा आहे. मेघदूतम्मधील यक्षाचे विरहातले वर्णन, ‘ऋतुसंहार‘मधील ऋतूंचे नयनरम्य चित्रण या सर्व रसगुणांची साक्ष आहेत. गेटे, जर्मन कवी, यांनी कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतलम् विषयी लिहितात, “
त्यांच्या लेखणीने संस्कृत साहित्यातील भाषाशैली, रूपकशैली आणि उपमेचे उच्चतम शिखर गाठले.
कवी कालिदास शृंगाररसाचे राजा आहेत. प्रणय, विरह, सौंदर्य यांची विलक्षण विण ते सादर करतात. शृंगार म्हणजेप्रेम, आकर्षण, सौंदर्य, आल्हाद, विरह, अभिसार, चेष्टा, लज्जा, मिलन यांचा मनोहारी आविष्कार आहे. शृंगाररसाचे एक अप्रतिम उदाहरण
अभिज्ञानशाकुंतलम् नाटकामधील दुष्यंत व शकुंतला यांचे प्रथम भेटीचे सौंदर्यदर्शन होय. संस्कृत श्लोकात कालिदास म्हणतात, “हे तन्वी (सुंदर स्त्री)! तुझं सौंदर्य असं आहे की तुझा सडपातळ देह जणू केशरी वस्त्रात नटलेला आहे, कानातील अलंकार तुझ्या चेहर्यावर चंद्रासारखं तेज फेकतायत, तुझे ओठ बिंब फळासारखे, डोळे निळसर कमळासारखे, तू तर श्रीकंठ (भगवान शंकर) यांच्या सौंदर्याची मानवी मूर्तीच आहेस! “येथे शृंगाररसाचा ‘संयोग‘ प्रकार आहे. तर ‘मेघदूतम्’मधील विरही यक्षाच्या तोंडून कालिदास म्हणतात,
त्वं जीवितं त्वमसि मे हृदयं द्विधेयं
त्वं दक्षिणा मम दिशश्च वनस्थली च।
“हे प्रिये, तूच माझं जीवन आहेस, तूच माझं हृदय आहेस, तू गेल्यापासून माझ्या दिशाच हरवल्या आहेत!” येथे ‘विप्रलम्भ शृंगार‘ म्हणजे विरहयुक्त प्रेम व्यक्त झाले आहे.
ऋतुसंहार’मधील प्रेमीयुगुलांचे वर्णन ः
प्रेमार्द्राणि प्रियतमवचः श्रोत्रमुग्राहयन्तो
गाढालिङ्गनविहितसुखा नन्दनं यान्ति युग्माः।
प्रेमात तल्लीन झालेले जोडपे एकमेकांचे प्रेमाचे शब्द ऐकत, हळुवार आलिंगनात गुंतलेले, वसंतातील आनंद घेत असतात. निसर्गचित्रण करताना कवी कालिदास फुले, झाडं, पर्वत, मेघ, पशु यांचे जिवंत चित्र उभे करतात. स्त्री व पुरुषाचे मानसशास्त्र ते उत्तम जाणतात. नारी मनाचे सूक्ष्म वर्णन करणारे हे प्रथम क्रमांकाचे कवी आहेत.
त्यांची संस्कृत लेखनशैली मधुर प्रभावी अभिजात व उच्च दर्जाची, पण सुलभ आहे.त्यांच्या साहित्य लेखनात पौराणिक संदर्भाचा मोठा पटच आहे. त्यामध्ये ते वेद, उपनिषदे, पुराण यांचा वापर करतात. साहित्य सौंदर्याचे सर्व आयाम उपमा, रूपक, अनुप्रास, उत्प्रेक्षा सर्व प्रकारांची रेलचेल त्यांच्या साहित्यात दिसते. त्यांच्या सहज लेखनातून सुविचारांची रांग लागते.
कालिदासाचे सांस्कृतिक, जागतिक महत्त्व
कालिदासाच्या साहित्याने हिंदू संस्कृतीतील प्रेम, धर्म, नीतिविचार, संस्कार यांना कलात्मकतेच्या शिखरावर नेले. त्यामुळे भारतीय साहित्याचे सत्त्वरूप म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. अभिज्ञानशाकुंतलम् हे नाटक जोहान वुल्फगँग गेटे (जर्मन साहित्यिक) याने ‘साहित्याचा चमत्कार‘ म्हणून गौरवले. फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, रशियन, जपानी इत्यादी 50 प्लस भाषांत कालिदासाचे साहित्य भाषांतरित झाले आहे. संस्कृत नाट्याचे आदर्श म्हणून कालिदासाच्या नाटकांचा अभ्यास आजही जगभर चालतो.
विद्वत्ता आणि विनय यांचा संगम ज्ञानप्राप्तीनंतरही कालिदासात अहंकार नव्हता, तर गंभीरता, गहिरं चिंतन आणि विनयशीलता होती.
‘कालिदास म्हणजे काव्याचा मेरू, सौंदर्याचा शिखर आणि कविकुलाचा गुरु! कविकुलाला दिशा देणारा, रसांना प्राण देणारा आणि संस्कृतीला गान देणारा म्हणजे कालिदास!‘