कचरा डोळ्यात गेला तरी डोळस विचार ठेवा!

पाणेदार डोळे म्हणजे छान, सुंदर डोळे म्हटले जाते. खरंच आरोग्याच्या दृष्टीने असतातही. शेतकरी, कॉन्ट्रॅक्टर, मजूर, मोटारसायकलवर प्रवास करणारे या सर्वांना कचरा, किडा आदी डोळ्यात जाण्याची खूप शक्यता असते. शेतात कांदा काढताना कांद्याचा कचरा डोळ्यात जातो, उसाचे पान लागते किंवा डोळ्यात जाते. तसेच बर्‍याचदा शेतात रासायनिक औषधांची फवारणी करत असताना त्यातील क्षार, अ‍ॅसिड, चुना डोळ्यात जातो. त्यामुळे या सगळ्या रुग्णांमध्ये डोळ्यातून पाणी येते, डोळे लाल होतात, दुखतात. अशा वेळेस अंधविश्वासाने गावातील किंवा आजूबाजूला असणार्‍या जोगत्याकडे किंवा बाबा, भगताकडे जातात व हे बाबा लोकही जिभेने अथवा रुमालाने, काडीने कचरा काढतात, ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नसतो.
अशा विचित्र पद्धतीने कचरा काढणार्‍या बाबाच्या ताब्यात लोक आपला मौल्यवान डोळा कसा देऊ शकतात? याचेच आश्चर्य वाटते. या बाबांकडून बरं न झाल्यावर डॉक्टरांकडे येतात तेव्हा खूप वेळ झालेला असतो. अशाप्रकारे जिभेने कचरा काढल्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. त्याकरिता रक्ताच्या व डोळ्याच्या अनेक तपासण्या कराव्या लागतात. त्यावरून कोणते उपचार करावेत हे ठरते. काही वेळा तर बुब्बुळ प्रत्यारोपण करावे लागते. एवढे प्रयत्न करूनही फक्त डोळा वाचतो, पण नजर गेलेली असते. त्यामुळे डोळ्याच्या डॉक्टरांनाच डोळा दाखवा, डोळस विचार ठेवा. याने तुमचेच डोळे चांगले राहतील.
काही कारणाने कचरा डोळ्यात गेला तर डोळे स्वच्छ पाण्याने साफ करणे, डोळ्यावर पाण्याचे सपके मारणे, हा उत्तम उपाय ठरू शकतो, डोळा न चोळणे हेही खूप महत्त्वाचे आहे. एवढी एक गोष्ट जरी सांभाळली तरी डोळ्याला होणार्‍या हानीपासून वाचवू शकतो.
छोटासा कचरा असला तर पाणेदार डोळ्यात टिकत नाही. वाहून जातो आणि बुब्बुळ सुंदर, स्वच्छ, क्रिस्टलक्लियर राहते.
ऊसतोड कामगार किंवा वेल्डिंगकाम करणार्‍यांनी प्रोटेक्टिव्ह शील्ड/चष्म्याचा वापर करावा. वाहन चालविताना गॉगल वापरावेत. सिक्रीलवर काम करणार्‍यांनी प्रामुख्याने आयटी सेक्टर क्षेत्रात काम करणार्‍यांनी ब्लू फिल्टरचा चष्मा वापरावा. शेती तसेच उन्हात काम करणार्‍यांनी ऊन-सावलीचा चष्मा वापरावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *