ट्रकचा टायर निखळल्याने अपघातात एक मजूर ठार

नांदगाव बुद्रुकजवळ घटना; सहा जखमी

अस्वली स्टेशन ः प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील वाडीवर्‍हे ते नांदगाव बुद्रुकदरम्यान एसएमबीटी हॉस्पिटलकडे जाणार्‍या रस्त्यावर गुरुवारी झाडे व मजूर घेऊन जाणार्‍या ट्रकला अपघात झाला. या घटनेत ट्रकचा टायर निखळल्याने वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन बाजूच्या शेतात उलटला.
अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला आहे. 3 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. याशिवाय, सहा-सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर गंभीर व किरकोळ जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी एसएमबीटी हॉस्पिटल आणि वाडीवर्‍हे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले. निवृत्ती गुंड यांनी तत्काळ मदत करत सर्व जखमींना योग्य वेळी दाखल केल्याने उपचार लवकर सुरू झाले. अपघातस्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.
लेकबील फाटा ते साकूर फाटा हा रस्ता खड्डेमय झाला असल्याने नागरिकांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतो. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे या भागात
दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय. भारत त्र्यंबक बेंडकुळी (वय 35), दीपक गणपत बेंडकुळी (40), पिंटू बाळू बेंडकोळी (45), समाधान हनुमंतराव वाघ (36, रा. गडगड सांगवी) अशी जखमींची नावे आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *