आधीच पांजरपोळ, गोशाळा फुल्ल; मोकाट जनावरे सोडायची कुठे?

ठेकेदारापुढे प्रश्न, जनावरे पकडण्याचे काम रखडले

सिन्नर : प्रतिनिधी
कळवण येथील एका वृद्धाचा मोकाट जनावरांच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर सिन्नर शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिक येथील पांजरपोळ, गोशाळा, संगमनेर, अकोले आणि म्हाळसाकोरे येथील गोशाळा ही फुल्ल असल्याने सिन्नर शहरात पकडलेली जनावरे सोडायची कुठे, असा प्रश्न मोकाट जनावरे पकडण्याचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराला पडला आहे.
शहरातील मोकाट जनावरांची समस्या वारंवार ऐरणीवर येत असल्याने सिन्नर नगरपालिकेने या जनावरांना पकडण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. एका ठेकेदाराला हे काम मिळाले आहे. मात्र नाशिक, संगमनेर, अकोले, म्हाळसाकोरे आदी ठिकाणच्या सर्वच गोशाळांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरे आहेत. त्यामुळे सिन्नर शहरातील पकडलेली जनावरे सोडायची कुठे, असा प्रश्न या ठेकेदाराला पडला आहे. त्यामुळे टेंडर मिळूनही जनावरे पकडण्याचे काम करता येत नसल्याने ठेकेदारही अडचणीत सापडला आहे. तर टेंडर काढूनही जनावरे पकडली जात नसल्याने नगरपालिका प्रशासनही हतबल झाले आहे.
सिन्नर शहरात सुमारे 125 ते 150 मोकाट जनावरे आहेत. त्यात गायी, बैल आणि वासरांचा समावेश आहे.
ही जनावरे कधी नगरपालिकेसमोर, कधी ग्रामीण रुग्णालयासमोर, कधी तहसीलसमोर तर कधी शहरातील कुठल्याही गल्लीबोळात सैरावैरा धावताना दिसतात. शहरात अनेकदा या मोकाट वळूंच्या झुंजी होतात. त्यात अनेकदा ज्येष्ठ, लहान मुले जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसानही झाले आहे. वारंवार यावर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर नगरपालिकेने मोकाट जनावरांना पकडण्याची निविदा गेल्या तीन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केली.
मालकीची जनावरे सोडतात शहरात मोकाट जनावरांपैकी किमान 50 जनावरे खासगी मालकांची आहेत. गायी व्याल्यानंतर ही मंडळी दूध काढण्यासाठी सकाळ – संध्याकाळ जनावरे घरी नेतात. आणि दिवसभर मात्र ती शहरात मोकाट सोडून देतात. त्याचाही त्रास सिन्नरकरांना होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *