मालेगावला चोरीच्या 11 दुचाकी जप्त

ग्रामीण पोलिसांची कारवाई; तीन संशयितांना अटक

मालेगाव : प्रतिनिधी
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणार्‍या टोळीवर कारवाई करत तीन संशयितांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 4 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 11 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. यातील एक संशयित फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना, बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मालेगाव शहर व नाशिक जिल्ह्यातील खेडोपाड्यांमधून चोरी केलेल्या मोटारसायकल कमी किमतीत विक्री करण्यासाठी काही संशयित सोयगाव येथे येणार आहेत. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून संदीप सोमनाथ वाघ (वय 21, रा. नववसाहत, सोयगाव), पवन निवृत्ती कदम (वय 20, रा. मु. मळगाव, पो. गिरणा डॅम, ता. नांदगाव, हल्ली विसे मळा, कॉलेजरोड, नाशिक) व विधिसंघर्षित (रा. लाडगाव, मालुंजे, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यात असलेल्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकल कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची
उत्तरे दिली.
त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी सदरची मोटारसायकल पवारवाडी, मालेगाव परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता, आरोपींनी मालेगाव, सटाणा, कळवण आणि नाशिक शहर आणि गावांमधून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या कब्जातून 4 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 11 मोटारसायकली हस्तगत केल्या. गुन्ह्यातील संशयित नदिम अहमद नासीर अहमद (रा. करीमनगर, मालेगाव) हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मगर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *