नाशिक पश्चिम विभागातील स्थिती; नऊ जण जखमी
नाशिक ः प्रतिनिधी
मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला आहे. शेतकरी किंवा लहान मुलांना बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यहानी किंवा जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट्या किंवा इतर प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत पावल्यास वन विभागाकडून नुकसानभरपाई देण्यात येते. नाशिक पश्चिम वन विभागात गेल्या दोन वर्षांत नऊ जण जखमी, तर चार जण मृत्युमुखी पडले आहेत.त्यांपैकी मृतांमध्ये एकाच्या वारसाला, तर जखमीत दोघांना कागदपत्रांच्या अभावामुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागले आहे.
वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, हत्ती, कोल्हा, लांडगा, मगर व माकड आदींच्या हल्ल्यामुळे मानवी हानी झाल्यास नुकसानभरपाई दिली जाते. मृत झालेल्यांना 25 लाख भरपाई दिली जाते, तर जखमींना पाच लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाते. सन 2024-25 मध्ये दिंडोरी येथील एकजण, 2025-26 मध्ये दिंडोरीत एक महिला, एक मुलगा व एक व्यक्ती मृत पावले. त्यांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाखांची नुकसानभरपाईची रक्कम देण्यात आली. सन 2024-25 मधील अर्जदाराचे कागदपत्र पूर्ण नसल्याने भरपाई मिळालेली नाही. जखमी नऊ जणांत आतापर्यंत दोघांंना कागदपत्रांअभावी नुकसानभरपाई मिळालेली नाही. उर्वरित सात जणांना एकूण सहा लाख 13 हजार 984 रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे. जखमी दिंडोरी, ताहाराबाद, देवळा व उंबरठाण येथील असून, सर्व बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
शासनाने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणार्या मानवी व पशुधन नुकसानीसाठी भरपाईचे दर निश्चित करणारी अधिसूचना जारी केली आहे. नुकतीच महसूल व वन विभागाने 1 फेब्रुवारी रोजी राजपत्रात ही अधिसूचना प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र वन्यप्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता भरपाई प्रदान करणे अधिनियम-2023 अंतर्गत हे दर लागू करण्यात आले आहेत. यात माणसाच्या मृत्यूसाठी 25 लाख रुपये, तर पशुधनासाठी कमाल 70 हजार रुपये दर आहे. शासनाच्या या निर्णयामुळे वन्यप्राणी हल्ल्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या नुकसानभरपाईसाठी लाभार्थ्यांनी संबंधित वन विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मृत्यू झाल्यास वारसांना 25 लाख भरपाई
वन्यप्राण्यांत वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, हत्ती, कोल्हा, लांडगा, मगर, माकड आदींच्या हल्ल्यामुळे मानवी हानी झाल्यास पुढीलप्रमाणे नुकसानभरपाई दिली जाते.
मानवी मृत्यू : 25 लाख रुपये
कायमस्वरूपी दिव्यांगत्व : 7.50 लाख
गंभीर इजा : पाच लाख
किरकोळ इजा : खासगी रुग्णालयात उपचार खर्च किंवा 50 हजार यांपैकी कमी असलेली रक्कम