नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे बहुतांश काम बाकी असताना उद्घाटन करण्याचा घाट घातला जात आहे. या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पहिल्या टप्प्याच्या कामाचे उद्घाटन होणार असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची लगीनघाई सुरू आहे. या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मात्र, इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नसल्यामुळे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला कसा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. असे असतानाही उद्घाटनाचा घाट घातला
जात आहे.
महात्मानगर येथील एबीबी सर्कलजवळ जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सद्यःस्थितीत पाच मजल्यांचे काम पूर्ण झाले असून, सहाव्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे. यासोबतच फर्निचरचेही काम सुरू आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन महापालिकेकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यास उशीर असल्यामुळे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याचा दाखल घेऊन त्यानंतर इमारतीचे उद्घाटन होणार आहे, असेे सीईओ मित्तल यांनी सांगितले. इमारतीचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी गेल्या 15 दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी दोन वेळा कामाची पाहणी करत आढावा घेतला.