अंबड एमआयडीसीतील कचरा, पालापाचोळा तातडीने उचलणार; अधिकार्‍यांचे आश्वासन

घंटागाड्यांच्या अनियमिततेवर पानसरे, कोठावदे कडाडले

नाशिक : प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील कचरा व पालापाचोळा त्वरित उचलण्यात येईल, असे आश्वासन महापालिका अधिकार्‍यांनी दिले. दरम्यान, घंटागाडीबाबतची अनियमितता सहन केली जाणार नाही, असा इशारा आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे व उमेश कोठावदे यांनी दिला.
घंटागाड्यांची अनियमितता, अंबड औद्योगिक वसाहतीत झालेले घाणीचे साम्राज्य, ठिकठिकाणी साचलेला पालापाचोळा यामुळे उद्योजक, कामगार व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने त्या पार्श्वभूमीवर, तसेच या सर्व बाबींवर मार्ग काढण्यासाठी अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पुढाकाराने आयमा रिक्रिएशन सेंटर येथे बुधवारी महापालिकेचे अधिकारी, सुपरवायझर आणि घंटागाड्यांचे ठेकेदार यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत संबंधित विषयावर चर्चा झाली.औद्योगिक वसाहत परिसरातील कचरा, पालापाचोळा तातडीने उचलण्याचे आश्वासन महापालिका अधिकार्‍यांनी दिले. घंटागाड्या नियमित अंबड वसाहतीत फिरतील, याची दक्षता घेण्यात येईल, असेही या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. घंटागाडी चालकांनी कोणत्याही उद्योजकांकडून पैसे घेऊ नयेत, असे त्यांना स्पष्ट बजावण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी नमूद केले. पाथर्डी फाट्याकडे जाणार्‍या घंटागाड्यांनी राँग साइडने जाऊ नये, असेही बजावण्यात आले.
बैठकीस आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, मनपातर्फे सुपरवायझर जमधाडे, ठेकेदारातर्फे अशोक कांबळे, विभागीय स्वच्छता निरीक्षक प्रमोद मारू व सहकारी उपस्थित होते. बैठकीचे सकारात्मक परिणाम दिसले. तातडीने कचरा उचलण्यास प्रारंभ झाला, असे कोठावदे यांनी सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *