सायबर पोलिसांची कामगिरी; डिजिटल अॅरेस्टसाठी पोलीस गणवेशात कॉल
लासलगाव : वार्ताहर
डिजिटल अॅरेस्ट प्रकारात ऑनलाइन फसवणूक झालेल्या तक्रारदाराचे तीन लाख 22 हजार रुपये परत करण्यात नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांना यश मिळाले. याप्रकरणी नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नागरिकांची अशी कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास लागलीच जवळील पोलीस ठाण्याला किंवा सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सूरज भाऊसाहेब काळे (रा. टाकळी- विंचूर, लासलगाव) यांना आरोपींनी संपर्क करून एफईडीएक्स ब्रँच जिल्हा अंधेरी येथून बोलत आहे, असे सांगून तुमच्या नावे एक पार्सल प्राप्त झाले असून, त्यात बेकायदेशीर सामान पाठविले आहे. त्यात चार इराणी पासपोर्ट व ड्रग्ज आणले आहे, असे सांगून तक्रारदारांना स्काइप या अॅप्लिकेशनद्वारे स्टेटमेंट व व्हेरिफिकेशनसाठी पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल केला.डिजिटल अॅरेस्टची धमकी देऊन तक्रारदाराच्या बँक खात्याची माहिती प्राप्त करून त्यांच्या बँक खात्यावरून दहा लाख रुपये पर्सनल लोन मंजूर करून ते पुढे आरोपींनी आरटीजीएसद्वारे त्यांचे बँक खात्यात वळवून तक्रारदारांंची फसवणूक केली आहे.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व हवालदार सुवर्णा आहिरे यांनी तक्रारीची तत्काळ दखल घेऊन बँकेला पत्रव्यवहार करून हे खाते गोठविण्यात आले व त्यावर शिल्लक असलेली 3,22,000 रुपये रक्कम तक्रारदारांना न्यायालयाच्या आदेशाने परत मिळवून देण्यात आली.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवून बँक खात्याची वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नये. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनद्वारे विचारत नाही. बँक खात्याविषयी माहितीकरिता संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन खात्री करावी. तसेच फोनवर पाठविलेल्या अनोळखी लिंकविषयी माहिती नसल्यास त्यावर क्लिक करू नये. आपल्या नावे कोणते पार्सल आले आहे किंवा मनी लाँड्रिंग असे आहे. अशाबाबत कोणताही फोन आल्यास विश्वास ठेवू नये, डिजिटल अॅरेस्टबाबत सायबर पोलीस ठाणे किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, अथवा सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 किंवा 1945 तसेच सायबर क्राइम पोर्टल यावर तक्रार नोंदवावी. नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशन क्रमांक फोन नं. 0253-2200408 .