यश हे अनेकदा इतरांना पाहावत नसतं. अपयश वाट्याला आलं तर फार कोणाला काही फरक पडत नाही, पण यशाचा आकस करणारे बहुतांश आपल्या आजूबाजूला असतात, याची जाणीव ठेवली पाहिजे म्हणून यशाच्या मार्गावर सावध, सजग असलं पाहिजे. असंच काहीसं चित्र निर्माण झाल्याचं आपल्या आजूबाजूला घडणार्या घटनांचे, घडामोडींचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला अनेक प्रकरणांत दिसतं. अपयशाचा कोणीही हेवा करत नाही हेदेखील सत्य आहे. हे कोणालाही वास्तव नाकारता येणार नाही.जगातील प्रत्येक क्षेत्रात असामान्य लोक आपल्या कामगिरीने सर्वश्रेष्ठ स्थान निर्माण करतात. स्थान निर्माण होत असताना त्या क्षेत्रात स्पर्धा नाही किंवा शत्रुत्व नाही असं होऊच शकत नाही. यशाची कल्पना, संकल्पना, यशपूर्ती ही शत्रुत्वाशिवाय पूर्ण होत नाही. म्हणजे यश हे कोणतंही असेल ते मिळवत असताना शत्रुत्व वाट्याला आलं नाही, असं उदाहरण सृष्टीवर तर चुकूनही सापडणार नाही.
जीवनातील कोणतंही यश हे सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत, कठीण परिश्रम, भयानक संघर्ष हा करावाच लागतो. यश ज्याच्या पदरी पडतं किंवा जो यशोशिखरावर जाण्याच्या दिशेने असतो किंवा यश मार्गावर मार्गक्रमण करत असतो. शत्रू हा त्याच्यासाठी वारसाहक्काने मिळणारा एक अनुभव आहे. अपयशाचा कोणीही हेवा करत नाही. मुळात यशाच्या वाट्याला वारसाहक्काने शत्रुत्व मिळतेच, हा इतिहास आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात चांगलं काम करत असताना ते काम-कार्य कितीही चांगल असू द्या, ते काही लोकांना योग्य वाटेल; परंतु अनेक लोकांना ते अयोग्य वाटेल. आपल्या त्या चांगल्या कार्यामुळे आपले अनेकांशी शत्रुत्व निर्माण होईल. यात आश्चर्यकारक असं काहीच नाही. कारण चांगल्या कामासाठी मेहनत घेतली जाते हे जरी सत्य असलं, तरी निंदा ही चांगल्या कामाच्या पाचवीला पुजलेली असते. मुळात कोणी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून नाही, तर आपलं कर्तव्य, जबाबदारी म्हणून कार्य केलं पाहिजे. शेवटी आपण आपल्या कार्यासोबत प्रामाणिक असलं पाहिजे. बाकी यशाच्या मार्गावर अनेक शत्रू वाट्याला आले, तरीसुद्धा आपण त्याकडे सोयीस्करपणे पूर्ण दुर्लक्ष करत आपलं मार्गक्रमण केलं पाहिजे. शत्रू वाट्याला येईल किंवा येणार म्हणून आपण यशाचा किंवा चांगला मार्ग स्वीकारायचा नाही, हे चुकीचे आहे. मुळात आपण आपलं कार्य निष्ठापूर्वक केलं पाहिजे. शत्रू आणि यश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे यश मिळालं की शत्रू मिळालाच, हे निश्चित आहे. म्हणून आपण यश मिळविताना फक्त यशाकडे न पाहता यशासोबत आपल्या वाट्याला शत्रुत्वसुद्धा येणार आहे, याची काळजी घेऊन मार्गक्रमण केलं पाहिजे.
अपयश पदरी पडलं तर कोणीही हेवा करत नाही मात्र, यश मिळालं तर अनेक शत्रू निर्माण होतात. कारण शत्रू हा यशाच्या मार्गावरील वारसा असतो. यशाच्या मार्गावर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक शत्रू दबा धरून बसलेले असतात. अकारण शत्रुभाव निर्माण होण्यासाठीदेखील आपण मिळविलेले यश हे अनेकदा कारणीभूत ठरत असते. हे गृहीत धरून आपल्या कौशल्याने प्रवास केला पाहिजे.