बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू : विडी कामगार नगर येथील घटना

नागरिकांकडून रस्ता रोको
बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू : विडी कामगार नगर येथील घटना
पंचवटी : वार्ताहर
पंचवटीतील विडी कामगार नगर येथील रविवार (दि.२९) सकाळपासून बेपत्ता असलेल्या तीन मुलांचा शोध लागला असून पाटालगत एका रहिवासी संकुलासाठी खोदण्यात
येत असलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचलेले असल्याने साई गोरक्ष गरड (१४), साई केदारनाथ उगले (१३) आणि साहिल हिलाल जाधव (१४) या तीनही मुलांचा या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिकवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी विडी कामगार नगर येथे नागरिकांकडून रस्ता रोको करण्यात आला होता .दरम्यान पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांनी आंदोलन मागे घेतले असून पुढील तपास आडगाव पोलिस करत आहे.
रविवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या मुलांच्या नातेवाईकांकडून दुपारपासून या मुलांचा शोध सुरू होता. मात्र ते कुठे आढळून आले नाही. अखेर सोमवार, (दि.३०) रोजी सकाळी विडी कामगार नगर येथील पाटालगत असलेला एका खाजगी इमारत बांधकामासाठी खोदलेला खड्ड्याच्या बाजूला या तीनही मुलांचे कपडे आणि चपला आढळून आल्याने हे तीन मुलं याच खड्ड्यात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या घटनेची माहिती कळताच आडगाव पोलीस आणि नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक दलांकडून तीनही मुलांचा शोध घेण्यात येऊन त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्या मुलांचे शव विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पाटालगत एक खाजगी बांधकाम व्यवसायाने इमारत उभारणीच्या निमित्ताने मोठा खड्डा खोदलेला आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने हे तीनही मुलं काल दुपारी आंघोळीच्या निमित्ताने इथे आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शहरात सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले आहे. खाली गाळ असल्याने या गाळात पाय फसून मुलांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

 

बांधकाम साईटवर कुठल्याही उपाय योजना नाही

साईटवरचा मुख्य गेट तुटलेला असून या ठिकाणी सुरक्षारक्षक नाही, बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले असून येथे कुठल्याही उपाय योजना केलेल्या नाही. त्यामुळे या मुलांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

पूनम सोनवणे, माजी नगरसेविका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *