सिन्नर तालुक्यात 43 हजार 765 जणांचे रेशन होणार बंद

आज ई-केवायसीसाठी शेवटची मुदत, अन्यथा लाभाला मुकावे लागणार

सिन्नर : प्रतिनिधी
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकेचा लाभ कायम ठेवण्यासाठी रेशनकार्डधारकांना
ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सोमवारी (दि.30) ई- केवायसीसाठी शेवटची मुदत आहे. दोनदा मुदतवाढ देऊनही तालुक्यात 43 हजार 765 नागरिकांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या प्रक्रियेसाठी मुदतवाढ न मिळाल्यास ई-केवायसी प्रलंबित असलेल्या नागरिकांना शिधापत्रिकेवर मिळणार्‍या धान्याला मुकावे लागणार आहे.
बनावट शिधापत्रिकाधारकांचा शोध घेण्याच्या उद्देशाने शासनाने लाभार्थी शिधापत्रिका धारकांना
ई-केवायसी करण्याची अट घातली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यास आज शेवटचा दिवस उरला आहे. त्यानंतर मुदतवाढ न मिळाल्यास लाभार्थ्यांना मोफत धान्याचा लाभ मिळू शकणार नाही. अन्न, सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाने यापूर्वीच याबाबत निर्देश दिले आहेत. तरीदेखील अनेकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नसल्याने त्यांची नावे शिधापत्रिकेतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

ई-केवायसीत आधार अपडेटच्या अडचणी

आधार अपडेट न केलेल्या व्यक्तींची ई-केवायसी होत नाही. त्यासाठी त्यांना आधार अपडेट करूनच केवायसी करावी लागणार आहे. यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. काहींच्या हाताची ठसे स्पष्ट नसल्याने त्यांच्याही केवायसी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे आधार अपडेट करूनच ही समस्या सुटणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य वितरकांकडूनही याबाबत लाभार्थ्यांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत.

स्वस्त धान्याच्या लाभासाठी ई-केवायसी अनिवार्य

मेरा केवायसी अ‍ॅपचा वापर करून लाभार्थ्यांना मोबाईलद्वारे घरबसल्या ई-केवायसी करता येईल. ज्यांना मोबाईलवर शक्य नाही त्यांच्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांकडे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिधापत्रिकेचा लाभ घेण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे.
– विवेक जमधडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, सिन्नर

एंकूण लाभार्थी :                          2 लाख 39 हजार 842
  ईं-केवायसी केलेले लाभार्थी :       1 लाख 96 हजार 77
  ईं-केवायसी न केलेले लाभार्थी :   43 हजार 765

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *