नीट परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून साधना भोसले या पोटच्या मुलीला मुख्याध्यापक असलेल्या पित्याने बेदम मारले. त्यात तिचा मृत्यू झाला. पालकांच्या पाल्याप्रति असलेल्या अपेक्षा कुठे घेऊन जाणार आहेत? हे प्रकरण संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारे आहे. हे केवळ एक उदाहरण नाही, तर अशा घटना सातत्याने घडताना दिसतात. पालकांच्या वाढत्या अपेक्षा, मानसिक, सामाजिक ताण यामुळे मुलींचे आयुष्य हरवत चालले आहे.
उंगली पकङके तूने
चलना सिखाया था ना
दहलीज उँची हैं ये, पार करा दे
बाबा मैं तेरी मल्लिका
टुकङा हूँ तेरे दिल का,
एक बार फिर से दहेलीज पार करा दे…
हे राजी सिनेमातील गीत. बाप आणि मुलीच्या नात्यातील वीण किती घट्ट, भावनाशील असते, हे दर्शविण्याचा प्रयत्न या गीतातून करण्यात आलेला आहे. एकीकडे बापाच्या काळजाचा तुकडा असलेल्या मुलीला बाप जीवापाड जपतो. तिच्या सुखासाठी वैष्णवी हगवणेच्या पित्याप्रमाणे मुलीला सासरी काही त्रास होऊ नये, यासाठी हवी ती किंमत मोजायला तयार असतो. एकीकडे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणार्या नीट परीक्षेत कमी गुणमिळाले म्हणून मुलीचा जीव घेणारा बाप किंवा पोटच्या मुलीचेच शोषण करणारा बापही समाजात आहे.
नीट परीक्षेत अपेक्षेइतके मार्क मिळाले नाहीत म्हणून साधना भोसले या पोटच्या मुलीला मुख्याध्यापक असलेल्या पित्याने बेदम मारले. त्यात तिचा मृत्यू झाला. पालकांच्या पाल्याप्रति असलेल्या अपेक्षा कुठे घेऊन जाणार आहेत? हे प्रकरण संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारे आहे. हे केवळ एक उदाहरण नाही, तर अशा घटना सातत्याने घडताना दिसतात. पालकांच्या वाढत्या अपेक्षा, मानसिक, सामाजिक ताण यामुळे मुलींचे आयुष्य हरवत चालले आहे.
अजूनही खेड्यापाड्यांत मुलींच्या शिक्षणाला दुय्यम स्थान दिले जाते. दहावी-बारावी झाली की, लग्न लावून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न केला जातो. मुलगी शिकून काय करणार, ही मानसिकता अजूनही समाजात आहे. गावखेड्यातील शेतकरी मजुरांनी आपल्या मुलीला शिक्षणाच्या प्रवाहातून काढून घरकाम, शेतीकाम, मोलमजुरीला लावलेली उदाहरणे आहेत. मुलाला मात्र बोर्डिंग किंवा इतर शहरांत शिकायला पाठवले जाते. कारण काय, तर मुलीच्या जातीला जपावे लागते. केवळ लिंगभेदामुळे तिची हुशारी ठरवली जाते.
काही बाप आपल्याला मुलगी म्हणजे जबाबदारी. शोषणाचे मूळ वाटत असते. त्यामुळे बालविवाहासारखे प्रकार सर्रास घडलेले आपण पाहतो. साधना भोसले यासारखे प्रकरण उत्तर प्रदेशातही घडले होते. एका विद्यार्थिनीला दहावीत 55 टक्के गुण मिळाल्याने आईने सतत टोमणे मारल्यामुळे तिने आत्महत्या केली. पोलीस तपासात मुलीची तुलना कायम दुसर्यासोबत करत असल्याने त्या मुलीच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता, असे समोर आले.
पालक म्हणून आपण आपल्या मुलांचे नक्की काय संगोपन करतो? त्यांना मानसिक आधाराची गरज असताना केवळ स्पर्धात्मक जगात बरोबरीला राहण्यासाठी सतत तुलना केली जाते. दबाव टाकून कंपनी मॅनेजरसारखे टार्गेट पूर्ण करायला भाग पाडतो का, याचा विचार पालकांनी करायला हवा. अन्यथा अजून किती साधनांचा बळी जाणार?
एकीकडे जीवापलीकडे मुलीला जपणारा बापही असल्याची उदाहरणे आहेत. नाशिकमधील उमेश शेळके या रिक्षाचालक बापाने स्वतः उपाशीपोटी राहून मुलीला डॉक्टर
केले. आज ती मुलगी डॉक्टर होऊन रुग्णालयात सेवा देत आहे. केवळ मुलीच असलेल्या कुटुंबात मुलींनी उत्तुंंग यश संपादन करून बापाचा नावलौकिक वाढविलेला आहे. हलाखीच्या परिस्थितीत मुलगी मुलाची जागा घेत आई-बापांना सांभाळत असून, सर्व जबाबदार्याही पार पाडत आहे. या मुलींना घडविणार्या बापांच्या कहाणीमुळे मुलींच्या जगण्याला बळ मिळते. समाजातील मुलींबाबत नकारात्मकतेला आशेचा किरण या उदाहरणांमधून मिळतो.
मुलांसह पालकांनाही समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे. कोणत्याच शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांच्या मानसिकतेकडे, दबावाकडे लक्ष दिले जात नाही. मुला-मुलींना अपयश आले तर त्यातून कसे सावरायचे, हेच समजत नाही. पालकांनाही सामाजिक स्टेटसच्या नावाखाली अपयश पचवणे कठीण जाते. अपयश नकोच असते. त्यामुळे मुलांचा जीव घेण्यापर्यंत घटना घडतात. समाजात मूल्यमापन, बरोबरी, तुलनेचे स्वरूप बदलायला हवे. मुलगा किंवा मुलगी डॉक्टर, इंजिनिअर होण्यापलीकडे माणूस म्हणूनही त्यांचे व्यक्तिगत आयुष्य आहे, हे स्वीकारायला हवे.
अजूनही समाजात मुलींना वाढीव खर्च, लग्नाचे ओझे, परक्याचेधन सांभाळण्याची जबाबदारी या मानसिकतेतून तिच्या शिक्षणावर, व्यक्तिमत्त्वावर, अस्तित्वावर मर्यादा लादल्या जातात. पण मुलगी जबाबदारी नाही, तर एक संधी मानली पाहिजे. कारण आताच्या काळात महिला देशाचे संरक्षण करण्यापासून ते सर्वच क्षेत्रांत जागतिक पातळीवर नाव कमवत आहेत. त्या केवळ शिकत नाहीत, तर बदल घडवतात. असे म्हणतात की, एक मुलगी शिकते तेव्हा केवळ तिचेच आयुष्य सुधारत नाही, तर तिच्या कुटुंबाचा आणि समाजाचाही उद्धार होतो.
साधनाच्या मृत्यूनंतर आपण अजूनही जागे झालो नाही तर पुन्हा अशा हृदय पिळवटून टाकणार्या घटना समोर येऊ शकतात. मुलीचे अस्तित्व टिकविणे, तिला बळ देणे, तिचे स्वप्न साकार करण्यासाठी तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज निर्माण झाली आहे. ही केवळ तिच्या माता-पित्याची नाही, तर समाजाचीही जबाबदारी आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. फुले-शाहु- आंबेडकर यांचा वारसा येथे जपला जातो. सावित्रीबाईंमुळेच आज मुलगी सर्वच क्षेत्रात झेप घेऊ शकली. असे असताना आजही अशा अनेक साधना जर पालकांच्या अपेक्षांच्या बळी ठरत असतील, तर समाज म्हणून आपण कधी तरी विचार करणार आहोत की नाही. अपेक्षांचे ओझे किती प्रमाणात असावे, याला कुठे तरी वेसण घालणे गरजेचे आहे.
देवयानी सोनार