अंधश्रद्धेतून भीती पसरविण्याचा प्रयत्न अंनिसने हाणून पाडला

शांतीनगरातील घटना; दारापुढे टाकलेल्या अस्थी घरमालक महिलेने स्वतः केल्या जमा

पंचवटी : वार्ताहर
मखमलाबाद परिसरातील शांतीनगर येथील एका सोसायटीत रात्रीच्या वेळी बंद दरवाजासमोर भानामती, करणी असे अंधश्रद्धायुक्त प्रकार करून रहिवाशांत भीती पसरविण्याच्या हेतूने स्मशानभूमीतून अस्थी व राख आणून टाकल्याचा प्रकार घडला. याबाबत घरमालकाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराने यांना तत्काळ संपर्क साधून माहिती दिली असता, कार्यकर्त्यांनी तत्काळ पोलिसांसह घटनास्थळाला भेट देत प्रबोधन केले. रहिवाशांच्या मनातील अंधश्रद्धेतून निर्माण झालेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत घडलेली घटना अशी की, मखमलाबाद रोडवरील शांतीनगर येथील वैजयंती अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावर दरवाजाबाहेर रात्रीच्या वेळी भानामती, करणी करण्याचा बहाणा करून, भीती पसरविण्याच्या खोडसाळपणा अज्ञात व्यक्तीने केल्याचे दिसले. यावेळी याठिकाणी स्मशानभूमीतून राख व अस्थी आणून रात्रीच्या वेळी बंद दरवाजापुढेे पसरविण्याचे सकाळी घरमालक महिलेला दिसले. त्यांनी तत्काळ महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांना तत्काळ कळविली.
डॉ. गोराणे यांनी शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे यांच्यामार्फत म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामणी व उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर यांच्याशी याबाबत संपर्क साधला. त्यांनी पोलिस हवालदार संतोष सुपेकर, विनायक तांदळे यांना अंनिसच्या कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी पाठवले.
यावेळी या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला रात्री कुलूप लावलेले असतानाही हा प्रकार घडला. म्हणजे इमारतीत राहणार्‍या व्यक्तीनेच हा प्रकार केला असल्याचे तेथील रहिवाशांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले.
यापूर्वीही दोन-तीन वेळा बंद दरवाजापुढे लिंबू, हळदीकुंकू
फेकल्याचेही आढळल्याचे काही रहिवाशांनी सांगितले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. ठकसेन गोराणे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, जिल्हा बुवाबाजीविरोधी संघर्ष सचिव महेंद्र दातरंगे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्त्री, शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे, त्रिवेणी पिंगळे, आशुतोष पिंगळे आदींनी स्थानिक रहिवाशांचे प्रबोधन केले. दरम्यान, अंनिसच्या प्रबोधनानंतर घरमालक महिलेने स्वतः पुढाकार घेऊन दारापुढील अस्थी व राख स्वतः जमा करून एका पिशवीत भरली. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विचार व कार्यपद्धतीची माहिती प्रल्हाद मिस्त्री यांनी उपस्थित रहिवाशांना दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *