कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध

अभोणा : प्रतिनिधी
देशभर स्वच्छ भारत मिशनचा उपक्रम राबविण्यात येत आहे. आरोग्य निरोगी राहावे, हा यामागे उद्देश असला, तरी कळवण तालुक्यातील अभोणा ग्रामपालिकेच्या कृपेने त्या उपक्रमाची साधी सावली न पडल्याने जेथे बघावे तेथे दुर्गंधीयुक्त कचर्‍याचे ढीग दृष्टीस पडतात. नांदुरी रस्त्यावरील कालव्यात ट्रकभर कचरा फेकल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अभोणा ग्रामपालिकेचा लौकिक स्वच्छतेसाठी नव्हे, तर अस्वच्छतेसाठी आहे. गाव मोठे, कचरा टाकू कुठे हा रोजचा ज्वलंत प्रश्न भेडसावत आहे. कचरा डेपोसाठी गावात जागाच नसल्याचा जावईशोध ग्रामपालिका प्रशासनाने लावून ठेवला आहे. गाव परिसरातील गावठाणच्या जागा स्थानिक व उपर्‍या लोकांकडून बळकावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे.
काही जागा गावपुढार्‍यांनी प्रधानमंत्री आवासच्या नावाखाली हजारो रुपयांत विकल्याच्या तक्रारी होत आहेत. आज गावाच्या दर्शनी भागात दुर्गंधीयुक्त कचर्‍याचेे ढीग पडले आहेत. नांदुरी रस्त्यावरील चणकापूर उजव्या कालव्यात
फेकलेला ट्रकभर कचरा तुंबला होता. दोन दिवसांपूर्वी धरणातून कालव्यात पूरपाणी सोडल्याने सर्व कचरा पाण्यासोबत कळवण- देवळा गावाकडे वाहून गेला. मात्र, काठावरील शिल्लक कचरा बघ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या दूषित पाण्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत लोकांच्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. त्यामुळे लोकांच्या सहनशीलतेचा कडेलोट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कळवण तालुक्यातील पश्चिम भागातील अभोणा ग्रामपालिकेला कररूपात व शासनाकडून मिळणारा 15 वा वित्त आयोग व पेसासारख्या निधीतून लाखोंचे उत्पन्न प्राप्त होते. पण ग्रामविकास समाधानकारक होत नाही. काही वर्षांपासून तर कचरा व्यवस्थापन व विल्हेवाट लावण्याची यंत्रणा कोलमडून पडली आहे. घंटागाड्या बंद आहेत. स्वच्छता कर्मचारी ठराविक ठिकाणी स्वच्छता करतात. ग्रामपालिका प्रशासन कचरा डेपोसाठी जागा उपलब्ध करू शकले नाही, हे अभोणेकरांचे दुर्दैव म्हणावे लागले.
– डी. एम. गायकवाड, आदिवासी सेवक, अभोणा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *