अवघ्या दहा रुपयांसाठी थेट गळा कापला

शहरातील गुन्हेगारीच्या घटनांत वाढ

सिडको : विशेष प्रतिनिधी
केवळ 10 रुपयांच्या वर्गणीवरून सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणांतच रक्तरंजित हल्ल्यात रूपांतरीत झाला. ही धक्कादायक घटना दि. 30 जून रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान भद्रकाली परिसरातील नानावली गोठ्याजवळ घडली. या हल्ल्यात रजा फिरोज शेख (वय 16) या अल्पवयीन तरुणावर टोळक्याने धारदार शस्त्राने थेट गळ्यावर वार केला.
हल्ला इतका गंभीर होता की, रजा हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. नागरिकांनी तत्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून पुढील उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवले. सध्या रजाची प्रकृती चिंताजनक असून, उपचार सुरू आहेत.
या प्रकारामुळे भद्रकाली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ 10 रुपयांच्या कारणावरून हाणामारी होऊन प्राणघातक हल्ला होतो, यामुळे नागरिकांत संतापाची भावना आहे. परिसरातील स्थानिकांनी या गुन्ह्याचा पोलिसांनी त्वरित तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी
केली आहे.
दरम्यान, भद्रकाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दररोज वाढणार्‍या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिक शहरात नागरिकांमध्ये भीतीचं सावट
पसरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *