द्राक्षबागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव, खर्चही वाढला
लासलगाव : वार्ताहर
मे महिन्यात जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात झालेला बेमोसमी पाऊस तसेच 7 जूनपासून सुरू असलेल्या मॉन्सूनमधील सलग पावसामुळे लासलगावसह जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार अडचणीत आले आहेत. या सततच्या पावसामुळे बागांमध्ये डाऊनी मिल्ड्यू, करपा, मावा, झांटोमोनस यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून, पुढील हंगामासाठी होणार्या घडनिर्मितीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त
होत आहे.
सलग दोन महिने पाऊस पडल्याने द्राक्षबागांमध्ये वापसा न झाल्यामुळे औषध फवारणी करण्यासाठी शेतकर्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तसेच असे पहिले वर्ष असेल की, मागील 30-40 वर्षांत मे महिन्यात रोज पाऊस झाला आहे.त्यामुळे पुढील वर्षाचा द्राक्ष हंगाम कसा राहील हे आता पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून राहणार आहे.
तसेच घडनिर्मितीसाठी काडीस सूर्यप्रकाशाची आवश्यकता असताना, मागील दोन महिन्यांपासून सूर्यप्रकाशाअभावी काड्यांचे पोषण व वाढ खुंटली आहे. यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पार पडणारी खरड छाटणी व काडीची योग्य परिपक्वता यावर पुढील हंगामातील उत्पादनाची गुणवत्ता व प्रमाण अवलंबून राहणार आहे.