52 रविवार, 76 विविध सण-उत्सवांच्या सुट्यांचा समावेश
निफाड : विशेष प्रतिनिधी
शालेय शिक्षण विभागाने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी शाळांसाठीच्या सुट्यांची अधिकृत यादी जाहीर केली. यानुसार 52 रविवार वगळता वर्षभरात विविध सण, उत्सवाच्या 76 अशा एकूण 128 दिवस सुट्या मिळणार आहेत. यामध्ये दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यांचाही समावेश आहे.
शिक्षण विभागाने यंदा वेळापत्रक आणि सुट्यांमध्ये स्पष्टता आणत शाळा व्यवस्थापनाला वेळेचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार दिवाळी सुटी 16 ते 27 ऑक्टोबर या कालावधित 10 दिवसांची, तर उन्हाळी सुटी 2 मे ते 13 जूनदरम्यान 38 दिवसांची असणार आहे. याशिवाय, विविध सण, उत्सव आणि धार्मिक पर्वांनुसार महिनानिहाय सुट्यांची योजना करण्यात आली. जुलै ते एप्रिलपर्यंतचे सुटीचे नियोजन करण्यात आले. यात सर्वच प्रमुख सणांचा समावेश करण्यात आला तसेच स्थानिक स्तरावर सण साजरे होण्याच्या तारखा वेगळ्या असल्यास आवश्यक त्या सुधारणा गटशिक्षणाधिकार्यांच्या मान्यतेनंतरच करता येतील, हेही स्पष्ट केले. शाळांना सलग तीन दिवस सुटी ठेवण्यास शासनाने बंधने घातली आहे. गावातील यात्रा किंवा स्थानिक सण यांसारख्या खास प्रसंगांशिवाय सलग तीन दिवस शाळा बंद ठेवू नयेत, असा स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिला. सुटी घेण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेसह गटशिक्षणाधिकार्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. मुख्याध्यापकांनी स्वतःच्या अधिकारात सुटी घेतल्यास ती किमान तीन दिवस आधी लेखी स्वरूपात कळविणेही अनिवार्य असेल.
जुलै आषाढी एकादशी, मोहरम, नागपंचमी- 2 दिवस
ऑगस्ट रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी 3 दिवस
सप्टेंबर गौरी विसर्जन, ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना : 4 दिवस
ऑक्टोबर गांधी जयंती व दसरा, दिवाळी सुटी 11 दिवस
नोव्हेंबर गुरुनानक जयंती : 1 दिवस
डिसेंबर ख्रिसमस: 1 दिवस
जानेवारी मकरसंक्रांती, शबे-ए-मेराज, प्रजासत्ताक दिन- 3 दिवस
फेब्रुवारी शबे-ए-बरात, महाशिवरात्र, शिवजयंती 3 दिवस
मार्च होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती, शब-ए-कदर ः 6 दिवस
एप्रिल गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : 2 दिवस
मे, जून : महाराष्ट्र दिन व उन्हाळी सुटी -39 दिवस जिल्हाधिकारी / मुख्याध्यापक अधिकारातील विशेष सुट्या -2 दिवस