मनपाकडून कार्यवाही; पाडकामाला महिना लागणार
नाशिक : प्रतिनिधी
रविवार कारंजा येथे 1968 मध्ये उभारलेल्या यशवंत मंडई जमीनदोस्त करण्याचा मंगळवारी (दि.1) श्रीगणेशा करण्यात आला. ही इमारत जीर्ण झाल्याने ती अत्यंत धोकेदायक बनली होती. त्यामुळे ती कधीही कोसळण्याची भीती असल्याने महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालत यशवंत मंडई पाडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या इमारतीचा धोकेदायक भाग पाडला जाणार आहे. पाऊस सुरू असल्याने इमारतीच्या काही भागाला तडे गेल्याने तेथील सिमेंटचा भाग पाडला जात आहे.
पालिकेच्या निर्णयाविरोधात काही व्यावसायिकांनी थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असता, तेथे त्यांचा काहीएक उपयोग झाला नाही. दोनदा इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट केले असता, त्यामध्ये ही इमारत अत्यंत धोकेदायक व जीर्ण झाल्याने कधीही कोसळेल, असा निष्कर्ष देण्यात आला होता. बांधकाम विभागाने कार्यारंभ आदेश देताच एस.सी. रॉड्रिक्स संस्थेने मंगळवारपासून ही इमारत तोडण्याचे काम सुरू केले आहे. सद्यस्थितीत कुठल्याही मशीनचा वापर न करता कामगारांद्वारे ती पाडण्यात येणार आहे. साधारणत: यशवंत मंडई पाडण्यासाठी महिन्याभराचा अवधी लागणार आहे. दरम्यान, या ठिकाणी इमारत पाडून बहुमजली पार्किंग उभारण्याची मागणी स्व. सुरेखाताई भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना पदाधिकारी सचिन भोसले यांनी केली होती. यशवंत मंडई जमीनदोस्त करून येथे मनपा बहुमजली पार्किंग अथवा व्यापारी संकुल उभारले जाणार आहे. रविवार कारंजा हा मध्यवर्ती व वर्दळीचा परिसर आहे. शहराची मुख्य बाजारपेठ असल्याने नेहमी गजबज असते. इमारत खाली केल्यानंतर नंतर पुढे पाडताना आजूबाजूची दुकाने, वाडे, रस्ता यांना कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. शहरात पार्किंगची समस्या भयावह असून, रविवार कारंजा परिसरही त्याला अपवाद नाही. वाहतूक कोंडीमुळे या परिसराचा श्वास कोंडला जातोय. त्यामुळे या परिसरात बहुमजली पार्किंग असावी. मध्यवर्ती बाजारपेठेत पार्किंगची समस्या डोकेदुखी ठरत आहे. याकरिता मनपा प्रशासन रविवार कारंजावरील यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली (मल्टिस्टोअर) पार्किंग बांधण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी पालिकेच्या या कारवाईला स्थगिती मिळावी, याकरिता भाडेकरूंनी उच्च न्यायालयात धाव घेतली असता, तेथे त्यांची डाळ शिजली नाही.
यशवंत मंडईची स्थापना 1965-66 मध्ये झाली. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या इमारतीचा शिलान्यास झाला होता आणि 1968 मध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री पी. जी. खेर यांच्या उपस्थितीत या मंडईचे उद्घाटन करण्यात आले होते. रविवार कारंजा परिसरात उभ्या झालेल्या या मंडईने तब्बल पाच दशके व्यापारी, ग्राहक आणि सामान्य नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून काम केले. या मंडईचे नाव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे उपपंतप्रधान राहिलेले यशवंतराव चव्हाण यांच्या सन्मानार्थ देण्यात आले होते. यशवंत मंडई चार मजली इमारत होती, जिच्यात मुख्यतः किराणा, भाजीपाला, अन्नधान्य यांची दुकाने, काही खासगी कार्यालये, तसेच वैद्यकीय सेवांचीही उपलब्धता होती. या इमारतीचा आराखडा त्या काळातले नागरी जीवन आणि बाजारव्यवस्थेचे दर्शन घडवणारा होता. पहिल्या मजल्यावर स्टेशनरी, कापड, पुस्तक दुकाने, दुसरा आणि तिसरा मजला डॉक्टर्स, क्लिनिक्स, वकिलांची कार्यालये, शिक्षण संस्थेसाठी होती. मात्र, आता यशवंत मंडई जमीनदोस्त होणार असल्याने अनेक आठवणी पुसल्या जाणार आहेत.
रविवार पेठ नाशिकचे नाक असून, मध्यवर्ती ठिकाणच्या भागात पार्किंगची व्यवस्था नसल्याने ग्राहक रविवार पेठ, मेनरोड आदींसह आजूबाजूच्या व्यावसायिकांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र होते. तसेच सुरक्षेच्या द़ृष्टीने ही इमारत धोकेदायक बनली असल्याने ती केव्हाही कोसळण्याची भीती होती. मात्र, आता ही इमारत पाडून बहुमजली पार्किंग उभारली जाणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसह व्यावसायिकांना फायदा होईल.
-सचिन भोसले, शिवसेना पदाधिकारी