भारतीय संस्कृतीत स्त्री ही कायमच एक आधारस्तंभ मानली गेली आहे. आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी अशा अनेक नात्यांमध्ये ती आपलं स्थान अबाधित ठेवत आली आहे. मात्र, एक काळ असा होता की, स्त्रीचं कार्यक्षेत्र घरापुरतंच सीमित होतं. विशेषतः स्वयंपाकघर म्हणजेच किचन हीच तिची ओळख बनली होती. पण, काळाच्या प्रवाहात, शिक्षणाच्या आणि आत्मभानाच्या मदतीने, ती आज कॉन्फरन्सरूममध्येही आपलं स्थान निर्माण करू लागली आहे. हा प्रवास सोपा नव्हता, पण नक्कीच प्रेरणादायी आहे.
पिढ्यान्पिढ्या स्त्रियांना घरातल्या जबाबदार्या पार पाडण्याचे शिक्षण मिळत गेले. बाहेरचं काम पुरुषाचं, आणि घरातलं काम बाईचं हे अलिखित नियम अनेक वर्षं पाळले गेले. त्यांचं शिक्षण लवकर थांबवून, लवकर लग्न लावून देणं हे समाजमान्य होतं. कौटुंबिक संस्कार, स्वयंपाक, घरातली शिस्त, पाहुणचार यात ती प्रवीण होती. पण तिच्या स्वतःच्या स्वप्नांना, आकांक्षांना फारसं स्थान नव्हतं.
स्त्रियांच्या शिक्षणाला महत्त्व दिलं जाऊ लागलं आणि इथेच बदलाची खरी सुरुवात झाली. शिक्षणाने तिच्या मनात आत्मविश्वास जागवला. तिला केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर
स्वतःच्या आयुष्यावर हक्क सांगण्याची जाणीव मिळाली. शिक्षणामुळे तिने बाहेरील जग पाहिलं, आपल्या क्षमतेचा शोध घेतला. हेच शिक्षण तिचा किचन ते कॉन्फरन्सरूमपर्यंतचा प्रवास घडवण्याची पहिली पायरी ठरली.
हा प्रवास मात्र थेट रस्ता नव्हता. प्रत्येक टप्प्यावर समाजाच्या रूढी, घरातील अपेक्षा, नात्यांमधील ताणतणाव यांचा सामना तिला करावा लागला. घर नीट ठेव, नोकरी कशाला? बाहेर गेल्यावर घर कोण बघेल? मुलं लहान आहेत, तुला वेळ कुठे आहे? हे प्रश्न तिच्या अंगावर आदळले. पण तिच्या जिद्दीपुढे हे सगळं क्षीण पडलं.
कॉन्फरन्स रूममध्ये पोहचल्यावर तिने केवळ एक कर्मचारी म्हणून नव्हे, तर एक नेतृत्वकर्ता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. टीम लीडर, मॅनेजर, सीईओ, उद्योजिका अशा विविध भूमिकांमध्ये ती चमकू लागली. तिच्या निर्णयक्षमतेला, चिकाटीला आणि सहनशक्तीला सगळ्यांनी दाद दिली.
घर आणि करिअर हे दोन टोकं तिने एकत्र सांभाळण्याची अनोखी कसरत शिकली. सकाळी डबा, मुलांचं शिक्षण, नंतर ऑफिस, ईमेल्स, प्रेझेंटेशन, मीटिंग्स आणि पुन्हा संध्याकाळी कुटुंब. ती थकली, कधी झोपही पूर्ण झाली नाही, पण तिने हार मानली नाही. ती दिवसेंदिवस अधिक सक्षम होत गेली.
स्त्रीच्या या प्रवासात काही पुरुषांनीही मोलाची भूमिका निभावली. पती, वडील, भाऊ, सहकारी ज्यांनी तिला समजून घेतलं, पाठिंबा दिला, तिच्यावर विश्वास ठेवला. समाजही हळूहळू बदलत गेला. महिलांसाठी सुविधा, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, मातृत्व रजा, वर्क फ्रॉम होम अशा गोष्टींनी या प्रवासाला गती दिली.
आज अनेक महिला डॉक्टर, अभियंते, वकील, शास्त्रज्ञ, लेखक, राजकारणी, स्टार्टअप उद्योजिका बनल्या आहेत. कल्पना चावला, किरण बेदी, इंदिरा नुई, सुधा मूर्ती, फाल्गुनी नायर, मिताली राज यांसारख्या महिलांनी लाखो मुलींना प्रेरणा दिली आहे.
तरीही, आजही ग्रामीण भागात, काही शहरांतही, अनेक स्त्रिया अजूनही केवळ किचनपुरत्या मर्यादित आहेत. त्यांच्या वाटचालीत अजूनही शिक्षणाची, संधीची, मानसिक पातळीवर स्वातंत्र्याची कमतरता आहे. त्यामुळे या प्रवासाची गती वाढवण्यासाठी अजून प्रयत्नांची गरज आहे.
किचनमधून कॉन्फरन्स रूमपर्यंत हा तिचा प्रवास म्हणजे एका स्त्रीच्या केवळ व्यावसायिक उन्नतीची गोष्ट नाही, तर ती तिच्या आत्मसन्मानाची, अस्तित्वाच्या लढ्याची कहाणी आहे. तिच्या या प्रवासात प्रत्येक पायरीवर असंख्य संघर्ष, अडथळे, पण तितक्याच जिद्दीने ती पुढे जात राहिली.
ती केवळ घर चालवते असं नाही, तर ती विचारही चालवते, निर्णय घेत राहते आणि आजच्या समाजाला पुढे नेणारी शक्ती बनते. तिचा प्रवास चालू आहे आणि तो थांबायचा नाही!
मृणाल पाटील