वरण-सुरणाची आमटी, भात -भगर, भाजी-भोपळा, पोळी-राजगिर्याचे फुलके, चटणी-नारळाची, चिंचेची, खजुराची, सुरणाची, कोशिंबीर -काकडीची, लोणचे- लिंबाचे उपवासाचे, भजी-रताळे पॅटीस. सुरणाची आमटी सुरणाच्या फोडी करून चिंच घातलेल्या पाण्यात कुकरमध्ये उकडून घ्यायच्या. त्या मिक्सरमधून काढताना त्यात जिरं, मिरची, आलं (चिंच हवी असल्यास अजून) घालून वाटून घ्यायचे. पाणी घालून आणि त्या वाटलेल्या सुरणाला तूप जिर्याची फोडणी घालायची. दाण्याच्या आमटीपेक्षा ही पचायला हलकी असते.
उपवासाचे थालीपीठ
राजगिरा, शिंगाडा दोन्ही पीठ एकत्र करून घ्यावीत. त्यात थोडी भगर मिक्सरला पीठ करून घ्यावे. या पिठात प्रमाणामध्ये वाटलेले जिरे, मिरची / तिखट, मीठ घालावे सर्व एकत्र करून फुलके /थालीपीठ करावे. शिंगाड्याचे पीठ अगदी थोडं घ्यावे. नाहीतर पीठ चिकट होतं. बरोबर नारळाची चटणी करावी.
सुरणाची भाजी
सुरणाच्या लहान फोडी करून घ्याव्यात. त्या थोड्या वेळ चिंचेच्या पाण्यात भिजवून ठेवाव्यात आणि मग त्याला जिरे, मिरचीची फोडणी द्यावी. भाजीप्रमाणे शिजवून घ्यावी.
सुरणाची चटणी
अगदी कवठाच्या चटणीसारखी छान लागते. सुरणाच्या कच्च्या फोडी ( चिंचेच्या पाण्यात थोड्या वेळ ठेवून धुवून घ्याव्यात) त्यात जिरे, लाल तिखट मीठ, गूळ आणि किंचित चिंच असं टाकून मिक्सरमध्ये चटणी करावी.
भगर जिरा राईस
भगर धुवून घेऊन त्याला तूप व जिर्याची फोडणी द्यावी. फोडणीत आवडीनुसार मिरची, तिखट टाकावे. त्यात लाल भोपळ्याचे तुकडे, काकडीचे तुकडे, ओला नारळ असं टाकून चांगले एकत्र करून घ्यावे. मग त्यात आवश्यक तेवढे पाणी घालावे ( भगरसाठी पाणी साधारण अडीच पट टाकावे.) उकळी आली की त्यात धुतलेली भगर टाकून शिजवायचे. आवडत असेल तर त्यात गूळ चिंच पण घालावे. छान लागते.
लाल भोपळ्याची खीर
लाल भोपळा धुऊन, साल काढून, किसून घ्यायचा. मग तो तुपावर थोडासा परतायचा. वाफ आली की त्यात दूध टाकायचं, साखर टाकायची, छान उकळायचे झाली खीर तयार. रताळ्याचा किस रताळे स्वच्छ धुऊन सालं काढून किसायचे. मग तूप, जिर्याची फोडणी करून त्याच्यावर तिखट किंवा मिरची तुकडे टाकून त्याच्यावर रताळ्याचा किस परतायचा. चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, ओलं खोबरं, कोथिंबीर असं सगळ टाकून हलवून छान व वाफ आणायची. बटाट्याच्या किसासारखाच करायचा, छान लागतो.
खजूर मिल्कशेक
खजूर बिया काढून स्वच्छ धुऊन घ्यायचा. खजूर, दूध, थोडीशी साय आणि साखर एकत्र करून मिक्सरवर वाटायचं. बारीक करताना थोडे काजू, बदाम मिक्स केले तरी छान लागतात.