दोन बछडे आणि नराचा बिनधास्त वावर, भय कायम
सिन्नर : प्रतिनिधी
चार वर्षांच्या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात गोंदे शिवारात गेल्या पंधरवड्यात मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी अवघ्या 200 ते 300 फूट अंतरावर मंगळवारी (दि.1) रात्री बिबट्याची 5 वर्षांची मादी वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात कैद झाली. मात्र, या भागात आणखी एका नर बिबट्याचा आणि दोन बछड्यांचा वावर कायम असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे.
गेल्या पंधरवड्यात गोंदेनाला शिवारात जान्हवी मेंगाळ या 4 वर्षांच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले होते. त्यानंतर याच ठिकाणी अशोक प्रभाकर तांबे यांच्या कुत्र्याचाही बिबट्याने फडशा पाडला होता. त्यामुळे या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने दोन पिंजरे लावले होते. दोन दिवसांपूर्वी वनविभागाने लावलेल्या एका पिंजर्यात ठेवलेली कोंबडी बिबट्याने पिंजरा तोडून खाऊन टाकली. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण होते. तोडलेला पिंजर्याला पुन्हा वेल्डिंग करून दुरुस्ती करून त्या ठिकाणी ठेवण्यात आला. मात्र, या ठिकाणापासून 200
फूट अंतरावर लावलेल्या दुसर्या पिंजर्यात मंगळवारी (दि.1) रात्री 10.30 वाजता बिबट्याची मादी जेरबंद झाली. वन विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. पी. झोपे, वनरक्षक किरण गोरडे, रूपाली गायकवाड, वन कर्मचारी निखिल वैद्य, रोहित लोणारे, वसंत आव्हाड यांनी रात्री उशिरा घटनास्थळी जाऊन पिंजर्यासह बिबट्याला ताब्यात घेत त्याला मोहदरी येथील वनोद्यानात हलवले.
घराबाहेर पडणे झाले मुश्कील
अशोक तांबे यांच्या थेट घरापर्यंत बिबट्या येऊ लागल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना घराच्या बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. सोमवारी (दि.30) रात्री 8 वाजेच्या सुमारास त्यांचे बंधू बाळासाहेब तांबे गोठ्यात गायीचे दूध काढत असताना बिबट्या त्यांच्यावर हल्ला करणार एवढ्यात घरावर पहार्यासाठी बसलेले अशोक तांबे यांच्यासह नातलगांनी जोराने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली आणि बाळासाहेब तांबे यांच्यावर होणारा हल्ला परतवून लावला.
बिबट्या प्रवण क्षेत्र, नागरिक दहशतीखाली
या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असल्याने नेमकी किती बिबट्यांचा वावर या भागात आहे, हे सांगणे आता स्थानिकांना मुश्कील होऊन बसले आहे. त्यामुळेच वनविभागाने एक किलोमीटरच्या परिसरात दोन पिंजरे लावले आहेत. आणखी एक पिंजरा तेथे लावण्यात येणार आहे. बिबट्याचे दोन बछडे आणि एक नर या भागात फिरत असल्याने त्यांनाही तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.