मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला यश; केंद्राकडून मंजुरी
नाशिक : प्रतिनिधी
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नाशिक रोड रेल्वेस्थानक येथे कुंभमेळादरम्यान भाविकांची गर्दी टाळण्यासाठी कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारण्यास मान्यता मिळाली आहे. देशातील एकूण 73 रेल्वेस्थानकांमध्ये नाशिकचा समावेश करण्यात आल्याने आगामी कुंभमेळ्यात रेल्वे स्थानकात गर्दी व्यवस्थापन करण्यास मोठी मदत होणार आहे.
दि.16 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 7 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीत, गर्दी नियंत्रणासाठी देशातील 60 प्रमुख स्थानकांवर कायमस्वरूपी होल्डिंग एरियाची निर्मिती करण्याचा निर्णय झाला आहे. दि. 4 ऑक्टोबर 2024 रोजी रेल्वेमंत्री यांच्या नाशिक दौर्यात, स्थानिक आर्किटेक्चर कॉलेजच्या सहकार्याने नाशिक रोड स्थानकाचा पुनर्विकास आणि मल्टीमोडल हब तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयाने नाशिक रोड स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 500 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये जी +20 मजली इमारतीचा समावेश आहे. त्याचबरोबर होल्डिंग एरियाची मंजुरी दिल्यास अतिरिक्त खर्च वाचून रेल्वेच्या सुविधांचा उत्तम वापर होईल अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती.
या अनुषंगाने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी होल्डिंग एरियाला मंजुरी देण्यासाठी दि. 17 मार्च 2025 रोजी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना यांना मंत्री छगन भुजबळ यांनी पत्र लिहिले होते. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाकडून कुंभमेळा 2027 नियोजनाअंतर्गत नाशिक रोड रेल्वेस्थानक येथेपरमंट होल्डिंग एरिया उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच देशातील 73 रेल्वे स्टेशन्स मध्ये नाशिकचा समावेश देखील करण्यात आला आहे.
73 स्थानकांचा गर्दी व्यवस्थापनात समावेश
या 73 स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्राधान्याने विविध कामे व उपाययोजनादेखील केल्या जाणार आहेत. यामध्ये गर्दीला स्थानकाबाहेरच थांबवण्यासाठी प्रशस्त प्रतीक्षास्थळांची निर्मिती केली जाणार आहे. अनधिकृत प्रवेश बंद, बॅरिकेडिंग करून फक्त आरक्षित तिकिटधारकांनाच थेट प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाणार आहे. जनरल डब्यांसाठी प्रवाशांचा प्रवाह पुढील व मागील भागांमध्ये समप्रमाणात विभागणे, 12 मीटर व 6 मीटर रुंदीचे नवीन डिझाइनचे फूटओव्हर ब्रिजेस एफओबी (रॅम्पसह) निर्माण करणे, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही बसवून एकत्रित मवार रूमम मधून देखरेख करणे, संपर्कासाठी वॉकी-टॉकी, घोषणा प्रणाली, कॉलिंग सिस्टिम इ. डिजिटल उपकरणे, अधिकृत रेल्वे व ठेकेदार कर्मचार्यांसाठी आरपीएफच्या मंजुरीनुसार नवीन ओळखपत्रे देणे, आपत्कालीन परिस्थितीत ओळख सुलभ व्हावी म्हणून सर्व कर्मचार्यांना गणवेश असणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत.