कांदा उत्पादक शेतकर्यांची मागणी
लासलगाव : वार्ताहर
कांद्याच्या बाजारभावात होणारी घसरण लक्षात घेता गुजरात सरकारने तेथील नुकसानग्रस्त शेतकर्यांना प्रतिक्विंटल 200 रुपये, कमाल 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्यांना राज्य सरकारनेदेखील 500 ते 1000 रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर करावे, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांकडून आता जोर धरू लागली आहे. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरू असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहे. नाशिक जिल्हा देशातील सर्वांत मोठा कांदा उत्पादक जिल्हा असून, येथील शेतकर्यांच्या कांद्याला 1400 ते 1500 च्या आत भाव मिळतो.
गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याच्या बाजारभावात प्रचंड घसरण झाली आहे. त्यातच अवकाळी पावसाने तीस टक्के कांदा हातचा गेला. ही सर्व परिस्थिती असताना कांदा उत्पादकांना केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेली जात असल्याचे कांदा उत्पादकांसह विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत आहे तसेच मागे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची दखल घेऊन गुजरात सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेदेखील राज्यातील कांदा उत्पादकांना 500 ते 1000 रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर करून आर्थिक दिलासा द्यावा.
– सचिन होळकर, कृषीतज्ज्ञ, लासलगावगुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना अनुदान मिळावे, अशी आमची मागणी आहे. गुजरात सरकारला हे शक्य आहे, मग महाराष्ट्र सरकारला का शक्य नाही. कांद्याचे घटते भाव आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची गरज आहे.
– भरत दिघोळे, अध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक संघटना