वसाच्या सरी आणि रिमझिम फुहारांनी प्रत्येकाचे मन मोहरून जाते. काळ्याकुट्ट ढगांमधून झरझरत बरसणार्या पावसाच्या थेंबांमध्ये भरलेल्या भावना आणि आठवणी आजही अनेक हिंदी चित्रपट आणि सुरेल गाण्यांतून अविस्मरणीय ठरलेल्या आहेत. चला तर मग, अशाच काही पावसाळी सिनेमांवर आणि सदाबहार गाण्यांवर एक नजर टाकूया.
पावसाने चिंब चित्रपटांचे विश्व
हिंदी सिनेमाने आपल्या सुरुवातीच्या काळापासूनच पावसाच्या सौंदर्याला विविध प्रकारे मोठ्या पडद्यावर उतरवले आहे. काही चित्रपटांचे कथानकच पावसाभोवती फिरते, तर काहींमध्ये पावसाशी संबंधित गाणी प्रेक्षकांना भारावून टाकतात. कधी आशेच्या स्वरूपात पावसाच्या थेंबांतून भावना दाखवण्यात आल्या, तर विरहाच्या वेदना सांगण्यासाठीही श्रावण-भाद्रपदाच्या आठवणी जागवल्या गेल्या. विशेषतः प्रेमीयुगुलांसाठी रोमँटिक क्षण घडवण्यासाठी पावसाळ्याचा ऋतू बॉलिवूडसाठी सर्वांत उपयुक्त मानला जातो. पडद्यावर आणि पडद्याबाहेरही पावसाचे जादूकधी कृत्रिम पावसात शिफॉन साडीत नायिकेचा नृत्य अभिनय गाजला, तर कधी खर्या पावसात मुंबईच्या रस्त्यांवर ‘रिमझिम गिरे सावन’ (अमिताभ-मौसमी चटर्जी : मंज़िल 1979)सारखी गाणी चित्रित झाली. आजच्या सोशल मीडियाच्या युगातही अनेक तरुण पिढी ही गाणी रिक्रिएट करून रील्स तयार करताना दिसते. हेच तर आहे बॉलिवूडच्या पावसाचं जादू नायक-नायिकांमधील
रुसवेफुगवे, नकार आणि मग कबुली… पावसाच्या टिपटिप सरींतून इतक्या दिलखेचक पद्धतीने चित्रित केली जातात की, अनेकांना हे क्षण प्रत्यक्षात अनुभवावेसे वाटतात.
“पुरवा के झोकवा से आयो रे संदेसवा…” किंवा “घनन घनन घिर आए बदरा…” ही गाणी केवळ आनंदच नव्हे, तर आशेचा-उत्साहाचासुद्धा वर्षाव करतात. “तुम्हें गीतों में ढालूंगा, सावन को आ दो…”, “मौसम है आशिकाना, ऐ दिल कहीं से उनको ऐसे में ढूंढ लाना…” अशा पावसात भिजलेल्या अनेक गीतांनी प्रेमवीर आणि सिनेरसिक यांना भुरळ घातली आहे. पावसाळा केवळ मिलनाची गाणीच गात नाही, तर विरहाच्या सुरांनाही उजाळा देतो. आठवतोय तो मोहम्मद रफींचा हळवा स्वर “अजहू न आए बालमा, सावन बीता जाए…”
पावसावरील चित्रपटांची मालिका
हिंदी सिनेमात काही चित्रपट तर संपूर्णपणे पावसाभोवतीच फिरतात. काहींना तर थेट “सावन” किंवा “बरसात” हीच नावं दिली गेली आहेत. 1945 मध्ये मोतीलाल आणि शांता आप्टे यांच्या “सावन”पासून सुरुवात झाली. 1949 मध्ये आलेल्या राज कपूर यांच्या “बरसात”ने हे सिद्ध केले की, पावसावर आधारित सिनेमे म्हणजे यशाचं हमखास सूत्र! नंतर “बरसात” नावाचे आणखी दोन चित्रपट आले, ज्यात बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते. 1960 मध्ये भारत भूषण आणि मधुबाला यांचा “बरसात की रात”, 1981 मध्ये अमिताभ बच्चन आणि राखी यांचा “बरसात की एक रात” आणि “बरखा बहार”, “मानसून वेडिंग”, “तुम मिले”, “लगान”, “आया सावन झूम के”, “प्यासा सावन”, “सावन की घटा”, “सोलहवां सावन”, “सावन के गीत”, “सावन का महिना”, “सावन को आने दो”, “सावन-भादो” यांसारख्या अनेक सिनेमांनी पावसाचा आनंद टिपला आहे. अविस्मरणीय पावसाळी गाणी
“प्यार हुआ इकरार हुआ…” राज कपूर आणि नर्गिंस यांच्या छत्रीखालील हळुवार चालत गेलेल्या या गाण्याने त्या काळातील प्रेमभावनांची शिखरं गाठली होती. आजही हे गाणं ऐकलं की, मनाला भिजवून टाकतं. “रोटी, कपड़ा और मकान” चित्रपटात जीनत अमानने गायलेले “हाय हाय ये मजबूरी..” या गाण्याने पावसाच्या वेळी नाते, जबाबदार्या आणि अधुरी प्रेमकहाणी या सर्व गोष्टी प्रभावीपणे मांडल्या. “जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात…” हे मधुबाला-भारत भूषण यांच्यावर चित्रित गाणं अजूनही लोकांच्या मनात ताजं आहे. चांदनी चित्रपटातील “लगी आज सावन की फिर वो झड़ी है…” हे रोमँटिक गाणं आजही काळजाला साद घालते.
हिट फॉर्म्युला झालेली पावसाची फुंकर पावसाळी गाणी प्रेक्षकांना खूप भावतात हे लक्षात आल्याने, काही सिनेमांमध्ये मुद्दामच पावसावर आधारित गाणी घातली गेली. “नमक हलाल” चित्रपटात अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्यावर चित्रित “आज रपट जाएं तो…” हे गाणं सुपरहिट ठरलं. “गुरू”मध्ये ऐश्वर्या रायने “बरसो रे मेघा…”वर केलेले नृत्य तर मनात घर करून बसतो. “दिल तो पागल है”मधील “कोई लड़की है…”, “मोहरा”मधील “टिप टिप बरसा पानी”, “फना”मधील “ये साजिश है बूंदों की…”, “1942 : ए लव्ह स्टोरी”मधील “रिमझिम रिमझिम…” ही सर्व गाणीसुद्धा पावसाच्या श्रावणधाराप्रमाणे लोकांच्या मनात ठसून राहिली आहेत. एकूणच, पावसाच्या सरींनी हिंदी चित्रपट आणि त्यांची गाणी चिंब चिंब करून टाकली आहेत. या गाण्यांनी आणि सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात प्रेम, विरह, आशा, आनंद आणि आठवणी यांचा वर्षाव केला आहे, तोही अगदी टिपटिप सरींप्रमाणे!