आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्या कर्मचार्यांच्या किमान वेतनातून काही रक्कम परस्पर काढून भ्रष्टाचार केला जात आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी लक्षवेधी आ. देवयानी फरांदे यांनी मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. आ. फरांदे यांची लक्षवेधी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली आहे.
या प्रकरणात मनपाच्या विविध विभागांमध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणार्या कर्मचार्यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार न देता, त्यांच्या खात्यांतून बेकायदेशीररीत्या रक्कम कपात केली जात असल्याचा आरोप आहे. या रकमेचा वापर भ्रष्ट कारवायांसाठी होत असल्याची माहिती समोर आली आहे. कामगारांना नोकरी गमावण्याच्या भीतीपोटी स्टॅम्पपेपरवर बेकायदेशीर स्वरूपात सही करायला भाग पाडले जात असल्याचाही आरोप आहे. या प्रकाराकडे मनपा प्रशासन, कामगार विभाग आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे नमूद करत, या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग एसीबीमार्फत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या विषयावर मुख्यमंत्री सभागृहात निवेदन करणार असून, विधानमंडळ सचिवालयाने गृह विभागाला या निवेदनाच्या 700 प्रती अधिवेशनाच्या दिवशी सादर करण्याचे आदेश दिले.