पाच ठिकाणांहून लाखोंचा ऐवज लंपास; चोरीपूर्वी शेतात मद्यप्राशन, नागरिकांत भीतीचे वातावरण
जायखेडा : प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला. अंबासन गावातील चोरट्यांचा पोलीस प्रशासनाकडून आजतागायत छडा लागला नाही, तोच चोरट्यांनी मोसम व करंजाडी खोर्यातील आनंदपूर, आसखेडा गावांमध्ये पाच ठिकाणी घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मोसम व करंजाडी खोर्यातील आनंदपूर व आसखेडा परिसरात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास धाडसी चोर्या केल्या. चोरीपूर्वी शेतातील एका ठिकाणी बसून त्यांनी मद्यप्राशन केल्याचे पुरावे आढळले आहेत. त्यानंतर त्यांनी बंद दरवाजे आणि कडी-कोयंडा लावलेली घरे लक्ष्य करत, दरवाजांचे
कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
यावेळी घरातील कपाटे फोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू असा लाखोंचा ऐवज लंपास केला. किरण कापडणीस (आसखेडा), गंगाधर भामरे (आनंदपूर), प्रकाश भामरे (आनंदपूर), समाधान भामरे (आनंदपूर) व पप्पू वळवी (आसखेडा) यांच्या शेतातील घरांमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून घरात असलेला मौल्यवान ऐवज लंपास केला. काही घरांमध्ये कपाटातील साहित्य पूर्णपणे अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. चोरट्यांनी संभाजी कापडणीस यांची दुचाकी पळवून नेली आहे. कुटुंब जागे झाल्याने चोरट्यांनी जवळच असलेल्या पेरूच्या बागेत पलायन केले. समाधान भामरे यांनी गस्ती पथकाला माहिती दिली. तेथून सालगडी असलेल्या दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत पैसे काढून घेतले.
प्रारंभी चोरट्यांकडून परिसरात पाहणी
परिणामी, चोरट्यांनी सर्व घरे व्यवस्थित पाहणी करूनच चोरी केल्याचे स्पष्ट होते. रात्रीच्या गस्त पथकातील पोलीस वाहनाला नागरिकांनी तातडीने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. चोरटे मराठी मिश्र हिंदीत बोलत असल्याचे समजते. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. श्वान पथक आणि ठसातज्ज्ञ पाचारण करून चोरट्यांचे ठसे व पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.