इगतपुरीकर सुखावले; गेल्या पाच वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद
घोटी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस होत आहे. गेल्या पाच वर्षांतील विक्रमी पाऊस 3 जुलैपर्यंत झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये चोवीस तासांत 120 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत 1318 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
दारणा धरणातून 4241 क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे, तर भावली धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर 26 क्यूसेकने विसर्ग सोडला आहे. इगतपुरी तालुक्याची तहान भागविणार्या व सिंचनाचे प्रश्न सोडविणार्या दारणा नदीच्या उगमस्थानी असलेल्या एक हजार 349 दलघफू साठवण क्षमता असणारे भावली धरण आज पूर्णक्षमतेने भरून ओसांडून वाहू लागले आहे. यामुळे तालुका सुखावला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व धरणसाठ्यात समाधानकारक वाढ झाली असून, महत्त्वाचे समजले जाणारे दारणा धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. या धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे येत्या चार-पाच दिवस पावसाने मेहेरबानी कायम ठेवली तर दारणा धरणसुद्धा लवकरच भरेल, अशी माहिती सेक्टर अभियंता यांनी दिली.
याबाबत वृत्त असे की, मागील आठ दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने अद्यापही इगतपुरी तालुक्यात उसंत न दिल्याने समाधानकारक होणार्या पावसाने तालुक्यातील धरणसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. तालुक्यात पडणार्या पावसाच्या सरासरीच्या 38 टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. यावर्षी पाऊस सरासरी ओलांडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तालुक्यातील धरणसाठ्यात भरमसाठ वाढ झाली असून, यातील भावली धरण पूर्णपणे ओव्हरफ्लो झाले आहे. दरम्यान, दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
दारणा नदीच्या उगमस्थानी बांधण्यात आलेल्या भावली धरणातील पाणीसाठा दारणा धरणात सोडून पुढे जायकवाडीला सोडण्यात येतो. तसेच संपूर्ण तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची मदार या धरणावर आहे. यामुळे मागील काही महिन्यांत या धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग केल्याने या धरणाने तळ गाठला होता. दारणा नदीलगतच्या गावांतील पिण्याच्या पाण्याची, सिंचनाची भिस्त या धरणावर असल्याने सर्व जण हे धरण भरण्याच्या प्रतीक्षेत होते. मुसळधार पावसाने शेतीची कामे रखडली आहेत. तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. विशेष म्हणजे, भावली धरण साडेचारला ओव्हरफ्लो झाले आहे. भावली धरणात विक्रमी 100 टक्के पाणीसाठा झाला आहे.
‘दारणा’तून पन्नास टक्के पाणी सोडले
दारणा धरणातून क्षमतेच्या पन्नास टक्के पाणी सोडण्यात आले आहे. 47,687 क्यूसेकने धरणातून पाणी सोडले असून, 3898 दलघफू पाणी सोडले आहे. दारणा धरणात 7149 दलघफू पाणीसाठा असतो तर आतापर्यंत तो 100 टक्के झाला असता, अशी माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर भरण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षी प्रत्येक धरणातील साठा हा तीन टक्क्यांच्या कमी होता.