राणेनगर रस्ता रुंदीकरणास प्रारंभ

काम पूर्ण होण्यास लागणार सहा महिने

सिडको : विशेष प्रतिनिधी
राणेनगर परिसरातील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आले आहे.
या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. ही मागणी मान्य करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत असले, तरी काम सुरू झाल्यामुळे तात्पुरत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सध्या रुंदीकरणाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, नागरिकांना जवळपास एक किलोमीटरचा वळसा घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. या ठिकाणी ‘प्रवेश बंद’चे फलक लावण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी काही कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असली, तरी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
प्रशासनाकडून या कामास किती कालावधी लागणार आहे, याची ठोस माहिती देण्यात आलेली नाही. तसेच कामाच्या ठिकाणी किंवा परिसरात कालावधी, प्रगती आणि पर्यायी मार्ग यासंदर्भातील कोणतेही फलक लावलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व नाराजी आहे.
विशेषतः शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार वर्ग, तसेच ज्येष्ठ नागरिक यांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम अत्यावश्यक असले तरी नियोजनाचा अभाव जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने कामाची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांद्वारे वेळोवेळी द्यावी, कामाचा कालावधी स्पष्ट करावा आणि पर्यायी मार्गांची माहिती फलकाद्वारे पुरवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *