मोबाईल हिसकावून चोरी करणार्‍या तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या

सिडको : विशेष प्रतिनिधी
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हिसकावून पळ काढणार्‍या आरोपींचा छडा लावत इंदिरानगर गुन्हेशोध पथकाने तिघा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून सुमारे दोन लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुरू गोविंद सिंग महाविद्यालय परिसरात एकाचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस
उपायुक्त परिमंडळ-2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना दिल्या होत्या.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी एमएसईबी ऑफिस, पाथर्डीगाव परिसरात एका रिक्षात फिरत असल्याच्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये शोएब सादिक शेख (वय 22, रा. जीपीओ रोड, खडकाळी), रिक्षाचालक नवीद मुक्तार शेख (22, रा. रसूलबाग कब्रस्तानाजवळ, खडकाळी), आसिफ हुसेन शेख (19, रा. अंजुमन गल्ली, भारतनगर, वडाळा, पाथर्डी रोड) या तिघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील मोबाईल चोरीची कबुली त्यांनी दिली. त्यांनी नाशिक शहरातील विविध भागांतून चोरलेले मोबाईल व रिक्षा मिळून एकूण दोन लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे मान्य केले.
ही कारवाई इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि सहाय्यक निरीक्षक (गुन्हे) सुनील अंकोलीकर यांच्या सूचनेनुसार गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, पोलीस नाईक पवन परदेशी, पोलीस अंमलदार सागर कोळी, अमोल कोथमिरे, प्रमोद कासुदे, जयलाल राठोड यांनी केली. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *